कोपनहेगन / वृत्तसंस्था
यजमान डेन्मार्कने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रशियाला 4-1 असा धक्का दिल्यानंतर कोपनहेगनसह अवघ्या डेन्मार्कवासियांच्या आनंदाला खऱया अर्थाने उधाण आले. या एकतर्फी विजयासह डेन्मार्कने युरो चषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. अन्य एका लढतीत बेल्जियमने देखील फिनलंडचा पराभव करत आगेकूच केली. त्याचप्रमाणे इतर निकालांचा फायदा मिळाल्याने स्वित्झर्लंडनेही गट अ मधून शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले आहे.
रशियाचा 4-1 असा धुव्वा उडवला, त्यात डेन्मार्कतर्फे मिक्केल डॅम्सगार्ड, युसूफ पॉल्सन, आंद्रेयास ख्रिस्तेन्सन व जोकिम महेले यांनी प्रत्येकी 1 गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. रशियाविरुद्ध डेन्मार्कने आणखी एकदा सरस खेळ साकारला. त्यांनी बेल्जियमविरुद्ध 21 शॉटस् ऑन गोल आक्रमणे केली होती. मात्र, त्यातील फक्त 5 ऑन टार्गेट राहिली. रशियाविरुद्ध किंचीत सरस कामगिरी करताना त्यांनी 16 शॉटस् ऑन गोल व त्यातील 10 ऑन टार्गेट असा सरस खेळ साकारला. याचाच त्यांना लाभही झाला.
वास्तविक, या लढतीत सर्वप्रथम रशियाचा संघ खाते उघडण्याच्या समीप होता. अलेक्झांडर गोलोव्हिनने गोलपोस्टच्या दिशेने जोरदार आक्रमण केले होते. मात्र, निर्णायक क्षणी त्याचा फटका थेट कॅस्परकडे गेला आणि रशियाची ही संधी निष्फळ ठरली. त्यानंतर डेन्मार्कने एकदा सूर सापडल्यानंतर अजिबात मागे वळून पाहिले नाही. डेन्मार्कतर्फे डॅम्सगार्डने 38 व्या, पॉल्सनने 59 व्या, ख्रिस्तेन्सनने 79 व्या तर जोकिमने 82 व्या मिनिटाला गोल केले. रशियाचा एकमेव गोल अर्तेमने 70 व्या मिनिटाला केला.
डेन्मार्कला बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यात किमान 2 गोलने विजय संपादन करणे व बेल्जियमने फिनलंडला किमान 1 गोलने पराभूत करणे आवश्यक होते.
बेल्जियमची फिनलंडवर 2-0 फरकाने मात
सेंट पीटर्सबर्ग ः जागतिक स्तरावरील अव्वलमानांकित बेल्जियमने फिनलंडचा 2-0 असा फडशा पाडत ब गटातील अव्वलस्थान आणखी भक्कम केले आणि येथेच त्यांचे बाद फेरीतील स्थान देखील निश्चित झाले. पूर्ण 9 गुण संपादन करत बाद फेरीत पोहोचणारा बेल्जियम हा या स्पर्धेतील तिसरा संघ ठरला. इटली व नेदरलँडस् या संघांनी देखील आतापर्यंत कमाल गुणांसह बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
बाद फेरी गाठण्यासाठी केवळ बरोबरी देखील पुरेशी ठरु शकते, याची कल्पना असल्याने बेल्जियमने येथे बचावावर अधिक भर दिला. फिनलंड संघाने येथे पहिल्या सत्राअखेर बेल्जियमला एकही गोल करु दिला नाही. मात्र, दुसऱया सत्रात 74 व्या मिनिटाला ल्युकासकडून स्वयंगोल झाल्याने ते खऱया अर्थाने बॅकफूटवर फेकले गेले. या अनपेक्षित आघाडीनंतर बेल्जियमने आक्रमणावर भर दिला आणि रोमेलू लुकाकूने 81 व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल करत आणखी भक्कम स्थिती प्राप्त करुन दिली. बेल्जियमने या लढतीत बॉल पझेशनच्या आघाडीवर 61 टक्के वर्चस्व गाजवले.