नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
बलात्काराच्या आरोपाखाली सुनारिया तुरूंगात शिक्षा भोगत असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्याच आलं आहे. गुरमीत राम रहीमनं पोटदुखीची तक्रार केली होती. यानंतर मेदांता रुग्णालयात गुरमीत राम रहीमची कोरोना चाचणी केली त्यात त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.
गुरमीत राम रहीम याला गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. यासाठी त्याला रोहतकमधील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या ठिकाणी त्याचं सिटी स्कॅन, एन्जिओग्राफी आणि फायब्रोस्कॅन करण्यात आलं. रोहतक पीजीआयनं त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. त्याला एम्स रुग्णालयात चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर एम्स रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात येत नाही. त्यामुळे तुरुंग प्रशासनानं त्याला मेदांता रुग्णालात नेण्याचा सल्ला दिला. तिथे चाचणी दरम्यान त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे, असं जेल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम दोन महिला अनुयायांसोबत केलेल्या बलात्कारप्रकरणी २०१७ पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.