टीआरए ब्रँड ट्रस्टचा 2021 चा अहवाल जाहीर : पहिल्या 10 मध्ये भारतीय ब्रँड नाही
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी डेलने भारतात पसंतीचा ब्रँड म्हणून नावलौकीक मिळवला आहे. म्हणजेच डेलच्या उत्पादनांना भारतीयांनी मोठी पसंती दर्शवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः डेलच्या लॅपटॉपने लोकप्रियता अधिकची मिळवली असल्याचे दिसून आले आहे.
टीआरए रिसर्चने याबाबतची माहिती दिली आहे. टीआरए ब्रँड ट्रस्टच्या 2021 च्या अहवालानुसार स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीची एमआय दुसरी लोकप्रिय कंपनी ठरली आहे. यानंतर पहिल्या 10 ब्रँडमध्ये एकही भारतीय ब्रँडचा समावेश नसल्याची बाब समोर आली आहे.
मोबाइलला सर्वाधिक पसंती
इतर 50 ब्रँडच्या यादीत वेगवेगळय़ा क्षेत्रातील ब्रँडचा समावेश आहे. यातही मोबाइलला सर्वाधिक पसंतीची श्रेणीचा मान मिळाला आहे, त्यानंतर लॅपटॉप व टेलिव्हीजन यांचा नंबर लागतो. या यादीत ओप्पोने 27 स्थानावरून प्रगती करत सहावे स्थान काबीज केले आहे.तर फ्रीज क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलजी रेफ्रिजरेटर्सने 2020 च्या तुलनेत 22 स्थानावरून सातवे स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे.
सोनी पहिल्या दहात
इतर 10 ब्रँडस्मध्ये सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हीजनचा समावेश आहे. चीनी फोन ब्रँड विवो 10 व्या स्थानी आहे. यासोबत डियोडरंट ब्रँड फॉग, दुध उत्पादक कंपनी अमूल दूध, अमूल बटर या भारतीय ब्रँडस्चा 20 च्या यादीत समावेश आहे.
18 भारतीय ब्रँडस्चा समावेश
50 च्या यादीत 18 भारतीय ब्रँड, 9 अमेरिकी ब्रँड आणि दक्षिण कोरीयातील 8 ब्रँडचा तसेच चीनमधील 7 ब्रँडस्चा समावेश आहे. एलजी टेलिव्हीजन तिसऱया स्थानावर असून प्रतिस्पर्धी कंपनी सॅमसंग चौथ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे आयफोनचा विचार करता ऍपलने लोकप्रियतेत पाचवे स्थान काबीज केले आहे.