बडोदा :
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू डेव्ह व्हॉटमोर हे भारताच्या देशांतर्गत बडोदा संघाला प्रशिक्षण देणार आहेत. बडोदा क्रिकेट संघटनेने याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे, व्हॉटमोर यांना भारताच्या देशांतर्गत संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव देखील आहे. त्यांनी 2 वर्षे केरळ संघाला प्रशिक्षण दिले आहे. बडोदाचे मुख्य प्रशिक्षक आणि मार्गदर्शक पदासाठी डेव्ह व्हॉटमोर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेत या विषयावर अंतिम चर्चा चालू असून सर्व गोष्टी फायनल झाल्या की प्रशिक्षकाच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे बीसीएने संघटनेने स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू असलेल्या व्हॉटमोर यांनी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर अनेक परदेशी संघाना प्रशिक्षण दिले आहे. 1990 पासून त्यांनी प्रशिक्षकाचा पदभार सांभाळण्यास सुरुवात केली होती.