पुण्यातील प्रकार, सिंधुदुर्गातील नर्स : महेश सारंग यांची कारवाईची मागणी
प्रतिनिधी / सावंतवाडी:
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी सुरक्षा किटची मागणी करणाऱया नर्सला तिच्या आई-वडिलांवरून शिवीगाळ करणाऱया पुण्यातील डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून या डॉक्टरवर कारवाईची मागणी होत आहे. नर्सचे काम करणाऱया कुणकेरी, नेमळे, वेत्ये येथील आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे महेश सारंग यांना ही बाब कळताच त्यांनी या नर्सना पुण्यातील परिचितांमार्फत सहाय्य उपलब्ध करून दिले. आता या नर्स परतीच्या वाटेवर आहेत. डय़ुटीवर येण्यावरून या डॉक्टरने या नर्सशी वाद घातला. त्याचा व्हिडिओ करून नर्सने व्हायरल केला.
पुण्यात या डॉक्टरचे हॉस्पिटल आहे तेथे अन्य भागातील कर्मचाऱयांसह सावंतवाडीतील नर्स काम करत होत्या. या नर्सना राहण्यासाठी या डॉक्टरने रुम आणि सिलिंडर उपलब्ध करून दिले होते. लॉकडाऊनमुळे काही दिवस त्या कामावर गेल्या नाहीत. परंतु या नर्सनी कामावर यावे, यासाठी सदर डॉक्टर
आग्रही होता. त्याने एका नर्सला सोमवारी कामावर या. अन्यथा रुम खाली करा, असे फर्मान सोडले. नर्सने कामावर येण्यासाठी सुरक्षा किटची मागणी केली. मात्र, अन्य कर्मचारी आहे त्या साधनसामुग्रीत काम करत आहेत. त्यामुळे तुम्हीही काम करा, असे सांगत या डॉक्टरने शिवीगाळ केली. नर्सने आमच्या सुरक्षिततेबाबत लिहून द्या, असे सांगितले. मात्र, लिहून द्यायला ही गव्हर्मेंट सर्व्हिस नाही. उलट मीच पोलिसांना लिहून देणार की, तुमच्यामुळे मला त्रास झाला, असे या डॉक्टरने नर्सला सांगितले. तसेच डय़ुटीवर या. अन्यथा रुम खाली करा, असे फर्मान सोडले.
या डॉक्टरच्या बोलण्याचा व्हिडिओ नर्सने शूट करून व्हायरल केला त्यामुळे एकच खळबळ माजली. ही माहिती सारंग यांना मिळताच त्यांनी पुण्यातील परिचितांमार्फत नर्सशी संपर्क साधला. त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी प्रयत्न सुरू केला आहे. या व्हिडिओत सदर डॉक्टर हॉस्पिटलमधील कामकाजासंबंधी बोलत आहे. मात्र, त्याने शिवीगाळ करणे डॉक्टरी पेशाला शोभणारे नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सारंग यांनी केली.