खानापूर येथील घटना : संतप्त जमावाचा हॉस्पिटलवर हल्ला
वार्ताहर / खानापूर
चुकीच्या उपचारामुळे मोदेकोप येथील सुरज शंकर गावडे वय 17 या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली . यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी वर्दे कॉलनीतील डॉ.रायन्नावर यांच्या हॉस्पिटलवर हल्ला करून प्रचंड मोडतोड केली आहे . डॉक्टरला अटक केल्याशिवाय मृतदेह स्विकारणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला असून यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
सुरज गावडे याला सोमवारी डॉ . रायन्नावर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.आज सकाळी डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे . मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरने हॉस्पिटल सोडून पळ काढला . ही घटना समजताच मोदेकोप येथील नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन मोडतोड केली .
त्यावेळी खानापूर पोलिसांनीही या ठिकाणी हस्तक्षेप करून नागरिकांचे समाधान केले मात्र संतप्त नागरिकांनी डॉक्टराला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे . सध्या खानापूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.