आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया अधिकार देण्यास विरोध
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया अधिकार देण्यास विरोध दर्शविण्यासाठी डॉक्टरांनी शुक्रवार, 11 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून यासंबंधीची माहिती देण्यात आली असून इमर्जन्सी वॉर्ड आणि कोरोनाबाधितांवरील उपचारांव्यतिरिक्त अन्य सेवा बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आपत्कालीन परिस्थिती नसेल तर शुक्रवारी रुग्णालयाच्या ओपीडी बंद ठेवण्याचा इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने अन्य डॉक्टर्स नाराज आहेत. या मुद्यावरूनच हा संप पुकारण्यात आला आहे. संपादरम्यान सेवेतील डॉक्टर्स आपत्कालीन आणि कोरोना रुग्णांची तपासणी चालू ठेवणार असले तरी इतर कोणत्याही वैद्यकीय सेवांमध्ये भाग घेणार नसल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली. या संपाचा देशभरातील शासकीय रुग्णालयांच्या ओपीडीसह अन्य उपचारांवर परिणाम होणार आहे.
संपाच्या निर्णयामुळे कोणत्याही विभागाच्या ओपीडीमध्ये डॉक्टर सेवा बजावताना दिसणार नाहीत. सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवा व्यतिरिक्त कोणतेही काम होणार नाही. बाह्य वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद ठेवल्या जातील. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत डॉक्टर पूर्ण संपावर असतील. शुक्रवारी संप झाल्यानंतर शनिवारी नेहमीप्रमाणे ओपीडीची सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर पुन्हा रविवारी ओपीडी बंद होईल. त्यामुळे आता सोमवारपासूनच रुग्णालयांचे ओपीडी सुरळितपणे सुरू होण्याची चिन्हे आहेत.
या वैद्यकीय सेवा बंद असतील
सर्व क्लिनिक, रुग्णालये
ओपीडी सेवा-सुविधा
नवीन शस्त्रक्रिया
या वैद्यकीय सेवा सुरू असतील…
आयसीयू, इमर्जन्सी सेवा
सीसीयू, कोविड केअर सेंटर
आपत्कालीन शस्त्रक्रिया