सातारा / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील 12 सरकारी आणि 32 खासगी जनावरांच्या डॉक्टरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने 117 गावातील 37 हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेमुदत पुकारलेल्या या संपाचे निवेदन वाई तालुका पशुवैद्यकीय डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. बिपीन खरात यांनी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांना दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, वाई तालुक्यातील 117 गावांमधील शेतकऱ्यांकडे अंदाजे 36 हजार जनावरे आहेत. ही जनावरे उपचाराविना राहू नये म्हणून राज्य सरकारच्या पशुवैदकीय विभागामार्फत वाई तालुक्यातील ओझर्डे, शिरगाव, किकली, पाचवड, ऊडतेरे, बावधन, ऊळुंब, रेणावळे, वेलंग, बोपर्डी, मांढरदेव, केंजळ, सुरुर, कवठे या गावांमध्ये पशुवैदकीय दवाखान्यामध्ये 12 सरकारी डॉक्टर आणि 32 खासगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या डॉक्टरांच्या विविध मागण्या राज्य सरकारच्या दरबारात प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची पुर्तता करुन घेण्यासाठी आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वाई तालुक्यातील सरकारी आणि खासगी अशा 44 डॉक्टरांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 36 हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.