वार्ताहर / हिंडलगा
सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पण, लॉकडाऊन संपन्याआधीच कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार सोमवार दि. 24 रोजी हिंडलग्यात ‘डॉक्टरांनो गावाकडे चला’ अभियान राबविण्यात आले. यादरम्यान संसर्गाची लक्षणे असलेल्यांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली.
हिंडलगा ग्राम पंचायत क्षेत्राला तालुक्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. काहींचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर अद्यापही सरकारी व खासगी रुग्णालयातून उपचार सुरू आहेत. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन संपण्याआधीच कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हय़ामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी ‘डॉक्टरांनो चला गावाकडे’ हे अभियान राबविण्यास बजावले आहे. याची सुरुवात तालुक्याच्या पश्चिम भागातील हिंडलगा गावामधून सोमवारी करण्यात आली.
यावेळी लॅब टेक्निशियन, तालुकास्तरीय टास्कफोर्सच्या पथकाद्वारे संसर्गाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन जागीच कोविडची रॅपिड अँटेजेन टेस्ट करण्यात आली. गावात रुग्णांची संख्या जास्त असल्याने सोमवारी काही घरातील नागरिकांची चाचणी झाली. तसेच सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये देखील कोविड टेस्ट सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी बाधितांनी न घाबरता सेंटरला भेट देऊन कोविड चाचणी करून घेण्याचेही आवाहन करण्यात आले.
तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर हमखास करून शासकीय नियमांचे पालन करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णवर, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी श्री मास्तीहोळी, ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, कोविड टास्कफोर्सचे नोडल अधिकारी बसवराज कोरीहुली, पीडीओ गंगाधर एन., ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर, अशोक कांबळे, रामचंद्र कुद्रेमानीकर, प्रविण पाटील, राहूल उरणकर, गजानन बांदेकर, सदस्या चेतना अगसगेकर यांच्यासह आरोग्याधिकारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, पंचायत कर्मचारी व इतर सदस्य उपस्थित होते.