पंढरपूर / प्रतिनिधी
येथील तहसीलदार वैशाली वाघमारे या मूलतः डॉक्टर आहेत. सध्याच्या कोरोनामुक्तीच्या लढ्यात त्यांनी पालिकेच्या दवाखान्यात जाऊन
रुग्णसेवा देण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला.
मंगळवारी संध्याकाळी प्रदक्षणा मार्गावरील पंढरपूर नगरपरिषदेच्या दवाखान्यात तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बजरंग धोत्रे रुग्णांची तपासणी करत होते. अशातच तहसीलदार वैशाली वाघमारे त्या ठिकाणी पोहोचल्या. प्रारंभी डॉ. धोत्रे यांना तहसीलदार दवाखान्यात भेट देण्यासाठी आल्या आहेत. असे वाटले. मात्र तहसीलदार वाघमारे यांनी आपण या ठिकाणी रुग्णसेवा बजावण्यासाठी आलो आहोत. असे सांगितले. अन चक्क स्टेटोस्कोपचा ताबा घेऊन डॉ. धोत्रे त्यांच्यासमवेत सुमारे 15 हून अधिक रुग्णांची तपासणी केली. अन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या दवाखान्यात आलेल्या रुग्णांना काळजी घेण्याच्या देखील सूचना केल्या.
तहसीलदार पदाची सूत्रे सांभाळत असताना. तालुक्यातील अनेक गोष्टींवर अधिकारी म्हणून लक्ष द्यावे लागते. अशातच आपल्या पदाची कार्यपूर्तता करून तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी मंगळवारपासून आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा देखील जनसेवेसाठी उपयोग करून घेण्यास सुरुवात केली.