प्रतिनिधी / मडगांव
‘आयएमए’ गोवाने कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय, नर्सेस तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना पैसे भरून विलगीकरणात ठेवण्याची सुविधा उलपब्ध केली आहे. त्यासाठी कोलवा, उतोर्डा व उत्तर गोव्यात सांगोल्डा येथे हॉटेल्स आरक्षित केल्याची माहिती आयएमए गोवाचे अध्यक्ष डॉ. एस. सॅम्युएल यांनी दिली आहे.
कोलवा येथील ‘ओशीऐनिक रेसिडेन्सी’, उतोर्डा येथील ‘हॉलिवूड प्लॅनेट’ तर सांगोल्डा येथील ‘ओशीऐनिक वेलनेस’ अशी तीन हॉटेल्स आरक्षित करण्यात आली आहे. सद्या कोरोनाचे संक्रमण झपाटय़ाने वाढू लागले आहे. त्यामुळे सरकारी व खाजगी प्रेक्टीस करणारे डॉक्टर, नर्सेस तसेच त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित होत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यासाठी ही पेड क्वारंटाईन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
आत्तापर्यंत कोलवा येथील ओशीऐनिक रेसिडेन्सीत 17 आणि सागोल्डा येथील ओशीऐनिक वेलनेसमध्ये 15 रुग्ण दाखल झाले आहेत. ते टेलिफोनिक कॉलवर आयएमए डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. त्याच बरोबर जर जागा शिल्लक असेल त्या प्रमाणे इतरांना देखील पेड क्वारंटाईनची संधी या ठिकाणी मिळणार आहे.
या रूग्णांसाठी मडगावचे डॉ. राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. त्यात वास्को येथील डॉ. अनिल मेहेंद्रीया (पल्मोनोलॉजिस्ट), फोंडय़ाचे डॉ. संदीप नाईक (चेस्ट फिजिशियन), डिचोली येथील डॉ. शेखर सालकर (ऑन्कोसर्जन), डॉ. सूरज प्रभूदेसाई (लेप्रोस्कोपिक सर्जन), डॉ. सुधीर शेट (कन्सल्टंट इन मेडिसिन) आणि आयएमए गोवा प्रांताचे अध्यक्ष डॉ. सॅम्युएल हे सर्व मडगावचे डॉक्टर उपलब्ध आहेत.
या पेड क्वारंटाईनमध्ये राहणाऱया रूग्णांनी एक किट खरेदी करणे आवश्यक आहे ज्यात पल्स ऑक्समिटर, थर्मामीटर आणि हॉटेलमध्ये ठेवलेले नियमित औषध असतात.
बायोमेडिकल कचऱयाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे व हॉटेलमध्ये आरामदायक राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. दरम्यान, घरात विलगीकरणात असलेल्या रूग्णांसाठी आयएमचे डॉक्टर टेलिफोनिक देखरेखीसाठी उलपब्ध असतील. तसेच सरकारला देखील वेळोवेळी सहकार्य करतील असे डॉ. एस सॅम्युएल यांनी कळविले आहे.