प्रतिनिधी /सांगे
सुळकर्णा येथील डॉन बॉस्को कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चरच्या (डीबीसीए) बीएस्सी कृषीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या ‘रूरल ऍग्रिकल्चरल वर्क एक्स्पिरियन्स प्रोग्राम’चा भाग म्हणून जैव खतांचा वापर करून बिजोपचार, मड बॉल खतांचा वापर करण्याचे तंत्र आणि सेंद्रिय इनपुट तयार करणे यासारख्या विविध विषयांवर माजोर्डा फार्मर्स क्लबच्या शेतकऱयांसमोर प्रात्यक्षिके सादर केली.
माजोर्डा येथे ग्रामीण शेतकामाचा अनुभव कार्यक्रमाच्या अंतर्गत पाच विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या गटातर्फे कृषीविषयी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. माजोर्डा शेतकरी क्लबच्या सदस्यांसह माजोर्डा-कलाता गाव येथे याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनी धन्निका डायस यांच्या भाषणाने त्यांचे स्वागत करण्यात आले. किरण हंगारागी यांनी नीम आधारित युरिया वापरून मड बॉल खताचे प्रात्यक्षिक सादर केले आणि अनुष्का डिसोझा यांनी बियाणे उपचाराच्या वेगवेगळय़ा जैविक व रासायनिक पद्धती दाखविल्या.
त्यानंतर उत्पादन सुधारण्यासाठी, खतांची बचत आणि मातीचे आरोग्य वाढविण्यासाठी जैव खतांच्या भूमिकेविषयी छोटय़ा गटाद्वारे चर्चा घडवून आणली गेली. यात अलिशा पीटर आणि जेजस मिस्किता यांनी भाग घेतला. शेतकऱयांना कमी किमतीत सेंद्रिय इनपुटच्या तयारीविषयी ज्ञान देण्यासाठी श्रीजिथा पिल्लई यांनी प्रात्यक्षिके सादर केली. या विषयाचे स्पष्टीकरण देण्यासाठी पिल्लई यांनी पॉवर पॉईंट सादरीकरण देखील प्रस्तुत केले. सामूहिक चर्चेत शेतकऱयांनी सक्रिय सहभाग दाखविला आणि उत्तम प्रतिसाद दिला. प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱयांना विद्यार्थ्यांकडून अधिकाधिक ज्ञान घेण्यास मदत झाली. गटाच्या सदस्या सिरिशा अवुला यांनी आभार मानून सत्र संपविले. संपूर्ण कार्यक्रम ‘कोविड-19’च्या एसओपीचे पालन करून आयोजित केला गेला.