प्रतिनिधी / गडहिंग्लज
पेठवडगाव येथील डॉ. आण्णासाहेब चौगुले यांना यावर्षीचा डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतिश घाळी यांनी या पुरस्काराची घोषणा केली. रोख 21 हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 11 जानेवारीला पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार 2001 सालापासून दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार साहित्यिक राजन गवस, आनंदराव तेलवेकर, नागाप्पा हत्ती, डॉ. सुर्यकांत घुगरे, जे. बी. बारदेस्कर, बसवराज आजरी, ऍड. श्रीपतराव शिंदे, अंजनाताई रेडेकर, डॉ. भिमराव गस्ती, विजयसिंह यादव, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. प्रकाश गुणे, डॉ. प्रकाश शहापूरकर, कल्लाप्पाण्णा आवाडे आदींना दिला आहे. यावर्षीचा पुरस्कार डॉ. चौगुले यांना जाहीर झाला आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडगाव येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. वडगाव येथे पोस्ट ऑफिस, पोलीस ठाणे सुरु करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वडगाव अर्बन बँकेची स्थापना त्यांनी केली आहे. वडगावचे नगरसेवक, सिनेट मेंबर, जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. आजही वडगाव बँकेचे आणि हातकणंगले सूतगिरणीचे चेअरमन म्हणून काम पाहतात. 11 जानेवारीला दुपारी डॉ. घाळी सभागृहात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महेश घाळी, प्राचार्य मंगलकुमार पाटील आदी उपस्थित होते.