राज्यातील कोरोनाचे सहा रुग्ण झाले ठिक : डॉ. गोम्स टीमवर कौतुकाचा वर्षाव
महेश कोनेकर / मडगाव
गोव्यात कोरोना व्हायरसचे 7 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने, सर्वांनाच धक्का बसला. गोव्यात पुढे काय होईल याची चिंता सर्वांनाच लागून राहिली होती. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार करण्याचे एक आव्हान समोर आले होते. अशा वेळी वैद्यकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. एडविन गोम्स यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली व त्यांनी ती समर्थपणे पेलताना, त्या सात रूग्णांसाठी ते खऱया अर्थाने देवदूत बनले.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सुरवातीपासून ‘कोविड-19’ संदर्भात पूर्ण सतर्कता बाळगली व खंभीरपणे पावले उचलली. मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच या ठिकाणी येणाऱया कामगारवर्गातील रूग्णांची संख्या लक्षात घेऊन हे हॉस्पिटल ‘कोविड-19’ हॉस्पिटल म्हणून घोषित केले. त्यानंतर गोमेकॉच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. एडविन गोम्स यांच्यावर कोविड-19 हॉस्पिटलची जबाबदारी देताना त्यांना नोडल ऑफिसर बनविण्यात आले.
डॉ. गोम्स टीमसमोर मोठे आव्हान
गोव्यात एका पाठोपाठ सात कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर त्या सर्वांना कोविड-19 हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी पाठविले. या रूग्णांवर उपचार करणे एक आव्हान डॉ. एडविन गोम्स तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱयांसमोर होते. कोरोनाबाधित रूग्णांवर कसे उपचार करायचे हे ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार डॉ. एडविन व त्यांच्या टिमने उपचारपद्धती अमलात आणली व त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
गेल्या काही दिवसांत रूग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत गेली. सुरवातीला एक रूग्ण ठिक झाल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली. त्याचवेळी डॉ. एडविन गोम्स व त्यांच्या संपूर्ण टिमचे सर्वांनीच कौतूक केले. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याची खुल्या दिलाने प्रशंसा केली.
कोविड-19 वर अद्याप औषध किंवा एखादी लस तयार झालेली नाही. जगभरात त्यावर संशोधन सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर उपचार करणे हे आव्हान होते व ते डॉ. एडविन गोम्स यांनी समर्थपणे पेलले असे म्हटल्यास ती अतिशोयक्ती ठरू नये.
डॉ. गोम्स यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
कोरोनाबाधित पहिला रूग्ण ठिक झाल्याची घोषणा आरोग्यमंत्री राणे व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केल्यानंतर डॉ. गोम्स यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यात प्रामुख्याने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रसिद्ध पार्श्वगायिका हेमा सरदेसाई, काणकोणच्या मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, मंत्री जेनिफर मोन्सेरात, डॉ. मनस्वी कामत तसेच इतरांचा समावेश होता.
गोमेकॉत मेडिसिन विभागाचे प्रमुख म्हणून काम हाताळणारे डॉ. एडविन गोम्स हे रूग्णांसाठी नेहमीच आधार बनून राहिलेले आहेत. गोमेकॉ म्हटले की, रूग्णांची सातत्याने गर्दी. त्या गर्दीत देखील ते रूग्णांना दिलासा देतात. त्यामुळे कोरोना रूग्णांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्याचा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा निर्णय हा अचुक होता यावर आत्ता शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील सहा पॉझिटिव्ह रुग्ण झाले निगेटिव्ह
एकेएक करत चार रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तर पुन्हा एक एक असे दोन मिळून सहा रूग्ण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह होते ते निगेटिव्ह झाले आहेत. आता फक्त एक रूग्ण शिल्लक असून तो सुद्धा नेगेटिव होण्याच्या मार्गावर आहे. सद्या त्याला क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.
………………………………………………………………………………………………………………………..