कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकपदी डॉ. कादंबरी बलकवडे यांना मुदतवाढ मिळाली आहे. नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या सभेपर्यंत त्यांचे हे पद कायम राहणार असल्याचे राज्यशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे निवडणूक प्रक्रिया घेता येत नसल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या गत सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे महापालिकेची निवडणूक मुदतीमध्ये घेता आली नाही. त्यामुळे राज्यशासनाने 6 महिन्यांसाठी महापालिकेवर प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती केली. त्यांची मुदत 30 एप्रिलपर्यंत होती. या दरम्यान, प्रशासनाने आरक्षण, प्रभाग रचना, प्रारूप मतदार यादी करण्याचे काम केले. अंतिम मतदार यादी करण्याचे काम सुरू असतानाच कोरोनाच्या दुसर्या लाटेचा धोका सुरू झाला. सध्या कोल्हापूर शहरात 300 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण नवीन आढळून येत आहेत. त्यामुळे निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्यशासनाने डॉ. बलकवडे यांच्या प्रशासकपदाची मुदतवाढ केली आहे. विशेष म्हणजे निवडणूक कधी होईल, याची शाश्वती नसल्याने नवे सभागृह अस्तित्वात येईपर्यंत त्यांना मुदतवाढ दिली आहे. यामुळे महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरनंतर कोरोना साथ आटोक्यात आल्यानंतरच होणार असून इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.