प्रतिनिधी /फोंडा
फोंडय़ातील मगो नेते व मगो पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचा वाढदिवस सोमवार 20 रोजी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नोकर भरतीमध्ये फोंडय़ातील सुशिक्षित तरुणांवर चाललेल्या अन्यायाच्या निषेधार्थ फोंडा शहरातून पदयात्रा काढण्यात आली. नोकरी भरतीमध्ये चाललेली वशिलेबाजी व भ्रष्टाचार, फोंडय़ातील रस्ते, उपजिल्हा इस्पितळात अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव आदी मुद्दय़ांवर निषेध फेरी काढून शहरातील दुकानदारांना पत्रके वाटण्यात आली.
डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्त्वाखाली तिस्क येथील मगो कार्यालयापासून प्रभूनगरपर्यंत फोंडा शहरातून ही निषेध पदयात्रा काढण्यात आली. त्यात फोंडा पालिकेच्या नगरसेविका गिताली तळावलीकर, अमिना नाईक, सीमा फर्नांडिस, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, कुर्टी पंचायतीच्या उपसरपंच शर्मिला सांगावकर, म गो पक्षाचे फोंडा गटाध्यक्ष मंगेश कुंडईकर, केंद्रीय समितीचे सदस्य अनिल नाईक यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ासंख्येने सहभागी झाले होते. विविध सरकारी खात्यांमध्ये सध्या नोकरभरती सुरु आहे. मात्र नव्वद टक्के जागा मुख्यमंत्र्यांच्या साखळी व आरोग्यमंत्र्यांच्या वाळपई मतदार संघातून भरल्या जातात. ही नोकरभरती म्हणजे मोठा घोटाळा आहे. फोंडय़ातील सुशिक्षीत तरुणांना पात्रता असूनही त्यातून डावलले जाते. या अन्यायाविरोधात सरकारचा निषेध करण्यात आला. फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात सीटी स्कॅन व पूर्णवेळ रक्तपेढीची सुविधा का उपलब्ध होत नाही? गेली पाच वर्षे मलनिस्सारण प्रकल्पाचे कारण पुढे करीत शहरातील रस्त्यांचे हॉटमिक डांबरीकरण लांबणीवर टाकण्यात आले होते. आता निवडणूक जवळ आल्याने हे काम पूर्ण न होताच रस्ते हॉटमिक्स कसे झाले ? फोंडय़ातील या तीन प्रमुख प्रश्नांवर या पदयात्रेतून नागरिकांमध्ये जागृती व सरकारचा निषेध करण्यात आला. दुपारी प्रभूनगर-फोंडा येथील सीएमएम कंपनीजवळ आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. भाटीकर यांच्या असंख्य चाहत्यांनी यावेळी उपस्थिती लावून त्यांनी वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या.