आज कट्टा येथे होणार अंत्यसंस्कार
वार्ताहर / कट्टा:
मालवण पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष, दुर्गादेवी देवस्थान मंडळाचे माजी अध्यक्ष, मालवण लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष, भंडारी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना कट्टा पंचक्रोशीत गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळख असणारे डॉ. चंद्रकांत उर्फ दादासाहेब विठ्ठल वराडकर (95) यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
परोपकारी आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीने डॉ. वराडकर सुपरिचीत होते. वयाच्या 90 व्या वर्षांपर्यंत त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, तीन मुली, नातंवडे, पुतणे, वहिणी असा परिवार आहे. डॉ. उल्हास वराडकर, वराडकर हायस्कूल कट्टाचे शालेय समितीचे अध्यक्ष तथा तरुण भारतचे प्रतिनिधी सुधीर उर्फ बापू वराडकर, संस्था सचिव तथा शिक्षिका विजयश्री वराडकर यांचे ते वडील होत. वृत्तनिवेदक ऍड. ऋषी देसाई यांचे ते आजोबा होत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा एकत्रित असताना डॉ. वराडकर हे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर ते पंचायत समिती सभापती म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. मतदारसंघातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच पाठपुरावा करीत. राजकीय नेतेमंडळींमध्ये त्यांचा दबदबा होता. ज्येष्ठ पदाधिकारी नेहमीच दादासाहेबांच्या घरी येऊन पक्षाच्या कामकाजाबाबत चर्चा करीत असत. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना कट्टा पंचक्रोशीतील गरीब विद्यार्थ्यांना प्रशालेत सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासन स्तरावरून अनेक उपक्रमही त्यांनी मंजूर करून आणले होते. दुर्गादेवी देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांनी गावात सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच पुढाकार घेतला होता. लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी मालवण शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिरांचे वारंवार आयोजन केले होते. लायन्स क्लबमार्फत अनेकांच्या शस्त्रक्रियाही त्यांनी मोफत करून दिल्या होत्या. भंडारी समाजाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी संपूर्ण जिल्हय़ाचा दौरा करीत मार्गदर्शन केले होते.