पणजी प्रतिनिधी
बोरपाडळे येथील प्रख्यात अशा संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या नूतन वास्तूचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नववर्षाच्या शुभ प्रसंगी संपन्न झाले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धनवंतरी स्तवनाने सोहळय़ाचा शुभारंभ झाला. स्वागत आणि प्रास्ताविका मध्ये फाऊंडेशनच्या सचिव आणि डॉ. दीपक पाटील यांच्या सुविद्य पत्नी डॉ. स्वाती पाटील यांनी संजीवनी हॉस्पिटल फाउंडेशन आणि नूतन वास्तू साकारण्यापर्यंतचा प्रवास, जिद्द, संघर्ष आणि चिकाटी यांचा उलघडा केला. बी ए एम एस कॉलेज सुरू करण्यामध्ये डॉ. प्रमोद सावंत यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून आजवरील खडतर प्रवासामध्ये साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले आणि रुग्ण सेवा हाच जीवनठेवा असल्याचा सिद्धांत व्यक्त केला. फाऊंडेशनचे शुभचिंतक डॉ. भारत पाटील यांनी डॉ. दीपक पाटील व डॉ. स्वाती पाटील यांच्या प्रचंड संघर्षातून साकारलेल्या स्वप्नपूर्तीबद्दल कौतुकोद्गार काढले आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्या मानवतावादी समाजकार्याचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. दीपक पाटील आणि डॉ. स्वाती पाटील यांच्या सेवाभावी वैद्यकीय सेवेचे आणि अत्यंत अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण अशा नूतन महाविद्यालयाच्या संरचनेचे कौतुक केले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, मी देखील तुमच्याप्रमाणेच बीएएमएसचा विद्यार्थी होतो. आयुर्वेदामध्ये आजही संशोधनाच्या खूप संधी आहेत. विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाच्या अभ्यासाने समाजआरोग्य जपावे. संजीवनी फाउंडेशनने राज्यभर वैद्यकीय सेवा द्याव्यात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आभारप्रदर्शन आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. गुरुदत्त शिंदे यांनी केले.
या सोहळय़ाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव डॉ. सौ. स्वाती पाटील, संचालिका डॉ. सौ. स्मिता पाटील, संचालिका शीतल थोरात, आनंदराव पाटील, सुमनताई पाटील, मार्गदर्शक दिग्वजिय पाटील, डॉ. बाबासो पाटील, डॉ. अभिजीत शिराळकर, डॉ. श्रीनिवास पाटील, संस्थेचे मार्गदर्शक श्री. दिनेश पाटील, श्री उत्तम नांगरे, श्री. मोहन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आभारप्रदर्शन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. गुरुदत्त शिंदे यांनी केले.
सोहळय़ाचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले. सोहळय़ासाठी सर्व अध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे बहुमोल सहकार्य लाभले.