प्रतिनिधी / सातारा :
सातारा न्यायालयाने केरळ रॅबरी प्रकरणात डॉ. निलेश साबळे यांना केरळ येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत त्यांना अटक करण्यात येवू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, केरळ येथील एका बँकेतून निक जोशी व त्याच्या सहकाऱ्यांनी सोने चोरून सातारा येथील एका महागडय़ा हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता. याबाबतची माहिती मिळताच केरळ पोलीसांनी सातारा पोलीसांच्या मदतीने संबंधित हॉटेलवर छापा टाकून निक जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली होती. यानंतर या सर्वांना केरळ येथे नेण्यात आले होते. चौकशीदरम्यान, निक जोशी याने केरळ येथील बँकेतून चोरलेले सोने सातारा येथे वितळवून सातारा येथीलच प्रतिभा हॉस्पिटलमधील डॉ. निलेश साबळे यांना विकले असल्याची कबुली दिली होती.
या कलावधीमध्ये डॉ. निलेश साबळे आणि सोने वितळविणारे कारागिर फरार झाले होते. डॉ. निलेश साबळे यांनीच चोरीचे सोने खरेदी केल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर डॉ साबळे यांनी सातारा येथील न्यायालयात नियमित अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी सुनवणी होवून डॉ. साबळे यांना सातारा येथील न्यायालयात नियमित अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करता येणार नाही. त्यांनी तो केरळ येथील योग्य त्या न्यायालयात करावा, तोपर्यंत त्यांना अटक करण्यात येवू नये असे निर्देश सातारा येथील न्यायालयाने दिले.