प्रतिनिधी / फोंडा
विख्यात न्यरो स्पाईनल सर्जन व गोमंतकीय सुपुत्र डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग कार्याचा आलेख असलेल्या डॉ. पी. एस. रामाणी संग्रहालयाचे उद्घाटन त्यांच्या मूळ वाडी-तळावली गावात रविवार 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. वाडी पठारावरील डॉ. रामाणी क्रीडा प्रकल्प मैदानावर हे संग्रहालय उभारण्यात आले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते सकाळी 11 वा. उद्घाटन होणार आहे. यावेळी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर हे उपस्थित राहणार आहेत.
श्रीमती अहिल्याबाई रामाणी प्रतिष्ठानतर्फे फोंडा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक नाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी डॉ. प्रेमानंद रामाणी, प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाश केंकरे, संग्रहालय प्रकल्पाच्या वास्तु विशारद रेनाटा फिगरेदो व प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. ऍंथोनीयो फिगरेदो हे उपस्थित होते. डॉ. रामाणी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक कार्याच्यह तसेच त्यांच्या सामाजिक कार्याच्या अनेक स्मृती या संग्रहालयात समाविष्ठ करण्यात आलेल्या आहेत, असे विनायक नाईक यांनी सांगितले. डॉ. रामाणी यांनी आपल्या मूळ गावात उभारण्यात आलेला क्रीडा प्रकल्प, सामाजिक सभागृह, वाचनालय, व्यायामशाळा या अन्य सामाजिक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे संगहालय उभारण्यात आल्याची माहिती डॉ. रामाणी यांनी दिली. वाडी गावापासून जागतिक स्थरावरील प्रवासाच्या अनेक आठवणींचा कोष म्हणजे हे संग्रहालय आहे. विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन डॉ. रामाणी यांनी केले. डॉ. रामाणी यांच्या बालपणापासून पुढील जीवनकार्याचा दाखला देणारे हे वैशिष्टय़पूर्ण असे संग्रहालय असल्याचे रेनाटा फिगरेदो यांनी सांगितले.