पंतप्रधानांसह भाजप पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील : होळीनंतर 20 ते 22 दरम्यान होणार शपथविधी
प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे मुख्यमंत्रीपद डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दर्शवला असून त्यांच्या नावास मान्यता दिली आहे. दरम्यान त्यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या रविवार दि. 20 मार्च ते मंगळवार दि. 22 मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात विधानसभा निवडणूक लढवली तसेच मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा पुढे करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदास पक्षांतर्गत काहीजणांचा विरोध असूनही त्यांना डावलणे पक्षश्रेष्ठींना शक्य झाले नाही, अशी माहिती अंतर्गत सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता केवळ त्यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रीपदासाठी होणे बाकी असून ती औपचारिकता राहिली आहे.
विश्वजित, माविन यांचीही होती नावे
आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांची नावे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पुढे आली होती. त्यामुळे भाजपचा विधिमंडळ गटनेता अद्याप निवडलेला नाही. शिवाय मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचा शपथविधी अद्यापही होऊ शकलेला नाही. त्यामुळे डॉ. सावंत यांच्या नावावर एकमत होत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. शिवाय भाजपमध्ये या विषयावरून अंतर्गत धुसफूस असल्याचेही समोर आले होते. डॉ. सावंत यांनी काठावर विजय संपादन केल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबत पक्षातील काहीजणांनी शंका उपस्थित केली होती.
पंतप्रधानांच्या बैठकीत सावंतांवर शिक्कामोर्तब
दिल्लीत काल बुधवारी झालेल्या भाजप श्रेष्ठींच्या बैठकीत तसेच डॉ. सावंत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत या प्रकरणी चर्चा करून शेवटी मुख्यमंत्रीपदाची माळ डॉ. सावंत यांच्या गळय़ात घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
डॉ. सावंत यांच्यासह संघटनमंत्री सतीश धोंड, गोवा प्रभागी सी. टी. रवी, गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन गोव्यातील सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली. तानावडे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी गोव्यातील सरकार स्थापनेसंदर्भात बोलणी केली आणि शेवटी केंद्रीय भाजप पक्षश्रेष्ठींच्या सर्वसंमतीने डॉ. सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदास मान्यता देण्यात आली.
अंतर्गत विरोधकांचे डावपेच फसले
आता डॉ. सावंत हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याने त्या पदासाठी दावा करणाऱयांचे त्यांच्या अंतर्गत विरोधकांचे डावपेच फसले असून त्यांच्यावर आता गप्प बसण्याची पाळी आली आहे.
लवकरच भाजप विधिमंडळ गटाची बैठक
गोव्यातील भाजपचा गटनेता ठरवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर व मच्छिमार मंत्री एल. मुरुगन यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना गोव्यात जाण्यास सांगण्यात आले होते. तथापि अजूनपर्यंत त्यांचे येणे झालेले नाही. उलट गोवा राज्याचे मुख्यमंत्री, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष दिल्लीत पोहोचले आणि तिथेच गटनेता निश्चित झाल्याने त्यांच्या गोव्यात येण्याचीही आता गरज राहिलेली नाही. तथापि औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ते येतील व जातील असा अंदाज आहे. येत्या काही दिवसात भाजप विधिमंडळ गटाची गोव्यात बैठक होऊन त्यात गटनेता म्हणून डॉ. सावंत यांच्या नावावर मोहोर लावण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधानांकडून गोव्यातील जनतेचे विशेष आभार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, प्रभारी सी. टी. रवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी पंतप्रधानांनी खूप आनंद व्यक्त केला. त्यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा तसेच धन्यवादही दिले. गोवेकरांनी दिलेल्या कौलामुळे गोव्याची सेवा करण्याची आणखी संधी मिळाली आहे. देशाबरोबराच गोवाही प्रगतीपथावर असून लवकरच गोव्यात समृद्धी आणण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य देईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.