प्रतिनिधी / फोंडा
गोमंतकीय सुपूत्र व जगविख्यात न्यूरो स्पायनल सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी गोव्यासाठी कोरोना आपत्कालीन मदत म्हणून रु. 1 लाखांचा निधी गोवा सरकारला सुपूर्द केला आहे. स्टेट बँकेच्या मार्फत ऑनलाईन ही रक्कम मुख्यमंत्री साहाय्य निधीत जमा करण्यात आली आहे.
मातृभूमीप्रती आपली बांधिलकी जपतानाच गोव्याला आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतुने त्यांनी हे साहाय्य केले आहे. डॉ. रामाणी हे मुंबईत वास्तव्यास असले तरी गोव्यात त्यांचे विविध माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. सामाजिक आरोग्यासंबंधी डॉ. रामाणी मेडिकल फाऊंडेशन, अहिल्याबाई रामाणी ट्रस्ट या माध्यमातून ते वर्षभर विविध उपक्रम राबवित असतात. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी मदत निधी पुरवून ही बांधिलकी जपली आहे.
प्रथमोचारासंबंधी गोमंतकीयांना सल्ला
गोव्याला मदत निधी पुरवितानाच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेला काही प्राथमिक उपायही त्यांनी संगितले आहेत. घसा दुखणे, अंगात ताप भरणे किंवा कोरडा खोकला येणे ही कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. आपण घरी बसूनही त्यावर प्रथमोपचार करू शकतात, असे डॉ. रामाणी सांगतात. घसा वारंवार कोरडा पडल्यास व खवखव जाणवल्यास मध व लिंबाचा रस घेणे. अंग तापल्यास क्रॉसीन तर श्वास घेण्यास त्रास होत असल्यास विक्स वॅपोरब लावण्याचा सल्ला ते देतात. याशिवाय दिवसभर भरपूर पाणी प्यावे व गरम सूप घ्यावा. विषाणू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लिंबाचा रस, संत्रे, अननस, आवाकडा, आंबा, आंले ही फळे खाणे उपयुक्त असल्याचा सल्ला डॉ. रामाणी यांनी दिला आहे. प्राथमिक उपचाराशिवाय आवश्यकता भासल्यास जवळच्या सरकारी इस्पितळात जाऊन उपचार घ्यावेत. स्वच्छतेसंबंधी स्वतःची व इतरांची काळजी घेताना फेस मास्क व हातमोज्यांचा वापर करावा. लॉकडाऊनच्या काळात शक्यतो घरातच थांबण्याचे व सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन डॉ. रामाणी यांनी केले आहे.