जुन्या काळात कान-नाक-घसा तज्ञ म्हणून लौकीक
कोल्हापूर प्रतिनिधी
वयाच्या 90 वर्षांपर्यंत रूग्णसेवेत कार्यरत राहिलेले शहरातील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ञ डॉ. माधव नारायण गोगटे (वय 93, रा. शिवाजी पार्क) यांचे मंगळवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुशिला, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी (दि. 9) सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे.
डॉ. गोगटे यांनी 1958 मध्ये एमबीबीएस आणि बीओआरएलची पदवी संपादन केली. त्याकाळी कोल्हापुरात नेत्रतज्ञ नव्हता. त्यामुळे डॉ. गोगटे यांनी नेत्रतज्ञ म्हणूनही रूग्णसेवा बजावली. पुढे डॉ. जोगळेकर यांच्या रूपाने कोल्हापुरात पहिला नेत्रतज्ञ आल्यानंतर डॉ. गोगटे यांनी डोळ्य़ाचा डॉक्टर म्हणून सेवा देणे बंद करत कान-नाक-घसा तज्ञ म्हणून रूग्णसेवा सुरू केली. प्रारंभी बिंदू चौक परिसरातील छत्रपती शिवाजी रोडवर बाबा गजबर यांच्या (रणजित स्टोअर्स) निवासस्थानातील जागेत त्यांचा दवाखाना होता. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरीतील एलआयसी ऑफीसजवळ दवाखाना सुरू केला. रोटरी वाचा-श्रवण संस्था सुरू करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. जन्मजात कर्णबधीर असणाऱया मुलांच्या उपचारांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कर्णबधीर मुलांच्या शाळेमध्येही ते सक्रीय होते. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि ईएनटी असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास असणाऱ्या डॉ. गोगटे यांना वाड्मयामध्येही विशेष रूची होती. ऍस्टर आधार हॉस्पिटलतर्फे 2017 साली त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. वयाच्या नव्वदीपर्यंत त्यांनी प्रॅक्टीस सुरू ठेवली. तीन वर्षांपूर्वी दवाखाना बंद केल्यानंतरही ते घरी कन्सल्टिंग करत असत. मॅनेजमेंट कन्स्लटंट आशुतोष गोगटे व अमेरिकेतील सायक्रॅटिक असोसिएशनचे संशोधन संचालक डॉ. नितीन गोगटे यांचे ते वडील होत.