मंत्री गोविंद गावडे यांचे आवाहन : डॉ.पी.एस.रामाणी संग्रहालयाचे उद्घाटन
प्रतिनिधी / फोंडा
विख्यात न्यूरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांचे जीवनकार्य युवा पिढीला खऱया अर्थाने प्रेरणा देणारे आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्तुंग अशा कार्याची माहिती डॉ. पी. एस. रामाणी सग्रहालयातून ठळकपणे मिळते. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले.
श्रीमती अहिल्याबाई रामाणी प्रतिष्ठानतर्फे डॉ. रामाणी यांच्या वाडी-तळावली या मूळ गावात उभारण्यात आलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन रविवारी सकाळी मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते झाले. या सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वाडी पठारावरील डॉ. रामाणी क्रीडा प्रकल्पवर हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, डॉ. प्रेमानंद रामाणी, वाडी-तळावलीचे सरपंच दिलेश गावकर व अहिल्याबाई रामाणी प्रतिष्ठाने सचिव विनायक नाईक हे उपस्थित होते. डॉ. रामाणी यांचे ‘ताठ कणा’ हे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचले पाहिजे. निदान त्यांच्या जीवनावर निघालेला चित्रपट गोमंतकीयांनी आवर्जून पाहावा, असे मंत्री गावडे पुढे म्हणाले.
डॉ. रामाणी यांनी मातृभूमिचे ऋण फेडले – कामत
गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षांत पदार्पण करताना डॉ. रामाणी सारखी रत्ने गोमंतभूमित जन्मली याचा गर्व करावा लागेल, असे दिगंबर कामत म्हणाले. डॉ. रामाणी यांची कर्मभूमी मुंबई असली तरी, त्यांनी फोंडा तालुक्यातील वाडी-तळावली या आपल्या मूळ गावात अनेक समाजोपयोगी प्रकल्प उभारुन मातृभूमिचे ऋण फेडले आहेत. सुभाष शिरोडकर म्हणाले, डॉ. रामाणी यांनी बालपणी जे स्वप्न उराशी बाळगले ते मोठय़ा जिद्दीने पूर्ण केले. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे जागतिक कार्य पाहिल्यास त्यांना कर्मयोगी म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी ते रोल मॉडल असून त्यांच्या कार्याची ओळख करुन देणारे हे संग्रहालय म्हणजे उत्तम डॉक्युमेंटश आहे. डॉ. रामाणी यांनी आपला जन्म व जन्मस्थानाचा खऱया अर्थाने उद्धार केला. डॉ. रामाणी यांच्यामुळे वाडी-तळावली गावाची ओळख जगभर पोचली असे सरपंच दिलेश गावकर यांनी सांगितले.
तर आपले जीवन सार्थकी लागेल : डॉ. रामाणी
आपल्या या संग्रहालयाला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी भेट द्यावी अशी इच्छा डॉ. रामाणी यांनी व्यक्त केली. त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्यास आपले जीवनकार्य सार्थकी लागेल. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार सामाजिक कार्याचा वाटा उचण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ साकोर्डेकर यांनी तर विनायक नाईक यांनी आभार मानले. मडगाव येथील प्रसिद्ध वास्तुविशारद रेनाटा फिगरादो यांनी या संग्रहालयाची मांडणी केली असून त्यात डॉ. रामाणी यांच्या जागतिक प्रवासातील अनेक स्मृती छायाचित्रे, मानसन्मान व अन्य वस्तुंच्या रुपाने जतन केल्या आहेत. डॉ. रामाणी यांनी वैद्यकीय क्षेत्रात स्वतः तयार केलेली उपकरणे तसेच सामाजिक कार्यातील स्मृतीही या संग्रहालयात पाहायला मिळतात. कार्यक्रमाला सुरुवातीला प्रसिद्ध गायिका सोनिया सिरसाट यांनी गीते सादर केली.