चेन्नई
तामिळनाडूतील अडय़ार कॅन्सर इन्स्टीटय़ूटच्या संस्थापिका डॉ. व्ही. शांता यांचे मंगळवारी चेन्नईत निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अनुभवी ऑन्कोलॉजिस्ट असलेल्या शांता 1986 मध्ये पद्मश्री तर 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारात अतुलनीय योगदान देण्यासाठी त्यांना ओळखले जाते. रेमन मॅगसेसे पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षे त्यांनी रुग्णांची देखभाल तसेच रोग अध्ययनावर कार्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. शांता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरील सर्वोत्तम उपचार सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांसाठी त्या सदैव स्मरणात राहतील. अडय़ार कर्करोग संस्था गरीब तसेच वंचितांची सेवा करण्यास आघाडीवर असल्याचे मोदींनी म्हटले आहे. नोबेल पुरस्कारविजेते सर सी.व्ही. रामन आणि सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्या कुटुंबाशी संबंधित डॉ. शांता यांनी 1949 मध्ये एमबीबीएसची पदवी प्राप्त केली होती. संस्थेला छोटय़ा रुग्णालयापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार केंद्रात रुपांतरित करण्यास डॉ. कृष्णमूर्ती यांच्यासोबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.