दि.7 रोजी सकाळी 6 वाजता होणार प्रारंभ
प्रतिनिधी/ सातारा
सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे प्रणेते डॉ. संदीप काटे यांनी नवीन वर्षाचा संकल्प म्हणून डिसेंबर महिन्यात 7 फेब्रुवारीला किल्ले अजिंक्यताऱयाची सलग नॉन स्टॉप चढाईउतराईची मोहिम करण्याचा केला आहे. तो दिवस आता केवळ सात दिवसांवर आला असून डॉ. संदीप काटे यांचीही तयारी जोरदार सुरु आहे. त्यामुळे अजिंक्य राहिलेल्या अजिंक्यताऱयाच्या साक्षीने डॉ. संदीप काटे हे स्वतः नवा जागतिक विक्रम करणार आहेत. त्याकरता त्यांचा दररोज कसून सराव सुरु आहे.
2020 हे वर्ष कोरोनुमळे घरातच प्रत्येकाने काढले. त्यामुळे जे मैदानावर असतात त्यांना घरात कोंडल्यासारखे झाले. याच काळात सातारा हाफ हिल मॅरेथॉनचे डॉ. संदीप काटे हे म मॅरेथॉनचा या पुस्तकाच्या लेखनात व्यस्त होते. लेखन संपल्यानंतर दि.12 डिसेंबरला पुण्यात झालेल्या एसआरटी ट्रायल अल्ट्रा या सिंहगड तोरणा या 53 किलोमीटरच्या रनमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्या रनमधील अनुभव डॉ. संदीप काटे हे स्वतःच्या शब्दात सांगताना म्हणाले, सह्याद्रीच्या डोंगरदऱयांतून, घनदाट जंगलातील पायवाटा पार करीत, प्रचंड चढ आणि तेवढय़ाच खडतर उताराच्या कडे-कपारीतून फिनिश लाईनच्या दिशेने एक एक पाऊल टाकताना मन आनंदाने आणि शरीर थकव्याने भरून येत होतं, पण त्या सगळ्या अनुभवातून जाताना ते क्षण कधी संपूच नयेत असंही वाटत होतं. कुणी म्हणेल हे असले सगळे प्रकार म्हणजे अतिरेक आहे, वेडेपणा आहे. असेलही कदाचित, पण मला तरी असं काहीतरी आगळं वेगळं आणि आव्हानात्मक करण्याच्या नुसत्या विचारानेच खूप आनंद होतो. त्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी करताना येणारे अनुभव मनाला ऊर्जा आणि शरीराला ताकद देतात. अशी मोठमोठी आव्हाने पार केल्यावर आयुष्यातील छोटय़ा छोटय़ा अडचणी मग त्यासमोर क्षुल्लक वाटू लागतात.
त्यांनी तेथेच एक नवा संकल्प केला तो म्हणजे एसटीआर अल्ट्राचा. अन् तयारी सुरु केली. त्यांनी फक्त एकदा अजिंक्यतारा किल्ल्यावर सराव करायला गेले होते. एकदा गड करून काही विशेष तयारी होणार नव्हती म्हणून एकाच दमात दोन वेळा किल्ला चढून उतरलेही. मुख्य मार्गाने वर आणि दक्षिण दरवाज्याकडून खाली आले. नॉन स्टॉप अजिंक्यतारा करण्याचा विचार त्यांचा पक्का झाला. येत्या 7 फेब्रुवारीला (रविवारी) मी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सलग, न थांबता, लागोपाठ, नॉन स्टॉप अजिंक्यतारा चढाई आणि उतराई डॉ. संदीप काटे हे करणार आहेत. पायथ्याच्या मंगळाईकडून (दक्षिण दरवाजा) वर जाणार आहेत. दक्षिण दरवाज्यापासून डावीकडे वळून तटावरून मुख्य द्वाराकडे आणि तिथून गाडीरस्त्याने परत खाली येणार आहेत. पुन्हा दक्षिणेकडून वर असं पूर्ण बारा तास करणार आहेत. डॉ. संदीप काटे हे दि.7 रोजी नवा विक्रम करणार आहेत. त्याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.