प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुंकळ्ळीचे प्रख्यात डॉक्टर स्व. सतीश फळदेसाई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार 26 रोजी सायंकाळी 4 वा. कुंकळ्ळी पालिका सभागृहात शोकसभा होणार आहे. या शोकसभेचे आयोजन कुंकळ्ळी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे करण्यात आले आहे. डॉ. फळदेसाई हे कुंकळ्ळी अर्बनचे अध्यक्ष होते. लोकांशी मोठय़ा प्रमाणात त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध जोडला गेला होता. सामाजिक कार्यातही त्याचा सहभाग होता.
नुकतेच वयाच्या 57 व्या वर्षी डॉ. फळदेसाई यांचे देहावसान झाले. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची पदवी मिळवल्यानंतर मुंबईत त्यांनी अन्य शिक्षण घेतले होते. मुंबईहून ते गोव्यात रेड क्रॉस संस्थेत रूजू होऊन दोन वर्षे त्यांनी सेवा दिली होती व नंतर कुंकळ्ळीत स्वतःचा दवाखाना सुरू केला होता. एक मृदुभाषी व अचूक निदान करून रुग्णांना दिलासा देणारे डॉक्टर म्हणून फळदेसाई यांनी अल्पावधीतच नावलौकिक मिळविला होता. अनेकांचे फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची जन्मभूमी अण्णे, बाळळी असली, तरी कुंकळळी ही कर्मभूमी राहिली होती. त्यांच्या दवाखान्यात रुग्णांची नेहमीच गर्दी असायची. न कंटाळता सगळ्या रुग्णांना दिलासा देणारे ते डॉक्टर होते, अशी प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर अनेकांनी व्यक्त केली होती.