बेळगाव/ प्रतिनिधी
निरंतर सेवेचा सुवर्णमहोत्सव या तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या डॉ. याळगी यांच्यावरील वृतांताची दखल घेऊन डॉक्टरांच्या अनेक हितचिंतकांनी त्यांचा सत्कार केला. टिळकवाडी येथील सिद्धिविनायक देवस्थान व गणेशोत्सव मंडळाने कोरोना काळात सेवा बजावणाऱया डॉ. याळगी यांच्या बरोबरच अन्य डॉक्टरांचाही सत्कार नुकताच केला.
सिद्धिविनायक देवस्थानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात डॉ. सतीश याळगी, जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये मानवी लस चाचणीच्या प्रक्रियेत असणारे डॉ. परितोष देसाई, टिळकवाडीतील डॉ. सी. एस. कुलकर्णी, डॉ. जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे, पंढरी परब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंढरी परब म्हणाले, कोरोना काळात जेव्हा अनेक दवाखाने बंद राहिले त्या काळात डॉ. सतीश याळगी, डॉ. कुलकर्णी, डॉ. देसाई, डॉ. सुधाकर जाधव यांनी आपली सेवा निरंतर बजावली. त्यांच्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या डॉक्टरांनी दिलेली सेवा ही महत्त्वपूर्ण आहे. या सेवेचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. डॉ. याळगी यांनी आपल्या सेवेचा सुवर्णमहोत्सव गाठला आहे. ही तर कौतुकाची बाब आहे. तसेच मानवी लस चाचणी प्रक्रियेत डॉ. परितोष महत्त्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सतीश याळगी, डॉ. सी. एस. कुलकर्णी, डॉ. जाधव, डॉ. परितोष देसाई यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रुग्णांचा विश्वास हीच आमची कमाई असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी देवस्थानचे व मंडळाचे कार्यकर्ते वैजनाथ गिलबिले, अशोक ढेगजकर, सतीश गोडसे, प्रसाद तवनोजीचे, भूषण व चिमू तवनोजीचे, राजू भातकांडे तसेच पुरोहित देशपांडे गुरुजी उपस्थित होते.