प्रतिनिधी / इस्लामपूर
जमावबंदी आदेशाचा भंग करुन येथील डॉ.सचिन सांगरुळकर यांच्या लक्ष्मी-नारायण हॉस्पिटलमध्ये प्रवेश करून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणातील चार आरोपींना पोलीसांनी अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, गुरुवार दि. २७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
गणेश वसंतराव पाटील(रा.कापूसखेड), रामदास आनंदा कचरे, सचिन उर्फ सनी मारुती खराडे(दोघे रा.इस्लामपूर), चंद्रकांत बाबुराव पाटील(रा.बावची) या चौघांसह रुपाली धोंडीराम पाटील (कापूसखेड) व शाकीर इसालाल तांबोळी(इस्लामपूर) यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतली होती.
त्या सर्वांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. तांबोळी याचा जामीन अर्ज दि.१७ रोजी फेटाळला. त्यानंतर त्याला पोलीसांनी अटक केली. दरम्यान त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो सध्या होमक्वारंटाईन आहे. रुपाली पाटील यांचे पती धोंडीराम यांचा कोरोनावर उपचार घेताना डॉ.सांगरूळकर यांच्या कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाला. डॉ.सांगरुळकर यांच्या हालगर्जीपणातून हा मृत्यू झाल्याचा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला. त्यांच्या उपचाराची फाईल आणण्यासाठी दि.७ मे रोजी या संशयीत आरोपींसह अन्य ५० ते ६० जण हॉस्पिटलमध्ये अनाधिकाराने गेले. याप्रकरणी डॉ.सांगरुळकर यांनी वर्दी दिली. पोलीसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. त्यातील चौघांना पोलीसांनी अटक केली.