शिवप्रताप गरूड झेप चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थिती
बेळगाव / प्रतिनिधी
आग्रा भेटीच्या थरारावर आधारित ‘शिवप्रताप गरूड झेप’ हा चित्रपट बुधवारपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रिमियर मंगळवारी बेळगावमधील आयनॉक्स चित्रपटगृहात पार पडला. त्यापूर्वी या चित्रपटाचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा व घोषणांनी चित्रपटगृहाचा परिसर दणाणून निघाला होता.
यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नितांत आस्था आहे. यापूर्वीही बेळगावकरांनी माझ्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले असल्याने चित्रपटाचा प्रिमियर बेळगावमध्ये व्हावा, हा माझा पहिल्यापासूनचा आग्रह होता. त्यामुळेच महाराष्ट्रासह बेंगळूर, कारवार, निपाणी व बेळगावमध्येही शिवप्रताप गरूड झेप चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अधिकाधिक शिवप्रेमींनी हा चित्रपट पाहून शिवप्रतापाचे हे संस्कार पुढील पिढीपर्यंत घेऊन जावेत, असे त्यांनी सांगितले.
त्यापूर्वी त्यांनी मराठा बँक येथे उपस्थित राहून सत्कार स्वीकारला. त्यानंतर शहापूर येथील शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन केले. बेळगावमधील शिवभक्तांनी त्यांचे जंगी स्वागत केले.