प्रतिनिधी / तिसवाडी
घणचे कटर घण ….. कटर घण …. अशा ढोल ताशांच्या निनादात व ग्रामदेवता सटी मायेच्या नाम घोषात डोंगरीच्या प्रसिद्ध इंत्रुज शिमगोत्सव मेळ मिरवणूकीमुळे येथील सारा परिसर रात्री उशिरा पर्यंत धूमधूमून गेला. येथील पाच मंडपाचे मेळ या मिरवणुकीत जल्लोषात सामील झाले होते.
डोंगरीच्या या पारंपारिक इंत्रुज अर्थात शिगमोत्सवाच्या मेळांचा आस्वाद घेण्यासाठी मंगळवार दि. 2 रोजी सकाळपासूनच लोकांनी डोंगरीत यायला सुरुवात केली होती. ती संध्याकाळपर्यंत वाढली. कोरोनाचे सावट जरी असले तरी ग्रामदेवतेच्या आशिर्वादाने कोणतेही भय नाही, असे मानून 5 वाजता या पारंपारिक मेळ मिरवणूकीला उत्साहात प्रारंभ झाला.
डोंगरीच्या दोन्ही भागातील पाच मंडपातील मेळ यात सहभागी झाले होते. यात थोरले भाटातील श्री षष्टी शांतादुर्गा तारी मंडप, श्री षष्टी शांतादुर्गा धोमे मंडप, श्री षष्टी शांतादुर्गा लालखी उत्सव मंडप, धाकटे भाटातील श्री जगदंबा षष्टी शांतादुर्गा मंडप व श्री षष्टी शांतादुर्गा देट्टयादेव मंडप यांचा समावेश होता.
ग्रामदेवता श्री षष्टी शांतादुर्गा देवीच्या नामघोषाने आणि ढोल ताशांच्या कर्णमधुर निनादाने डोंगरी परिसर धुमधुमून गेला होता. हातीं ग्रामदेवता देवीचे छत्र, गुडय़ा, तोरण, अब्दागीर घेऊन लहान थोर या मिरवणुकीत जल्लोषात सहभागी झाले होते. डोंगरी नगर प्रदक्षिणा पूर्ण करून मेळ ही मिरवणूक रात्री आपापल्या मंडपात विसर्जित झाली. यानंतर दोन्ही भागात प्रत्येकी एक नाटय़प्रयोग सादर करण्यात आले.
या मिरवणूकीला गर्दी अपेक्षित असल्याने संध्याकाळी पाच नंतर चारचाकी वाहने डोंगरीत सोडली गेली नाहीत. अनेकांनी पार्किंगची सोय मंडूर तिंटो रस्त्याकडील जागेत, कोंकण रेल्वे पुलाजवळी खुल्या जागेत केली. येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचे नियंत्रण होते.