प्रतिनिधी /पणजी
डोंगरी धाकटे भाट येथील संगीत शारदा विद्यालयाच्या गुणवंत कलाकारांचा गौरव समारंभ नुकताच पार पडला. संगीत विद्यालयात गायन, भजन, तबला, हार्मोनियम वगैरे लहान मुलांना शिकवले जाते अशा या विद्येत पारंगत झालेल्या बाल कलाकारांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
गौरव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, प्रमुख वक्ते तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक, कला संस्कृती खात्याचे कार्यक्रम अधिकारी गोविंद शिरोडकर, साहित्यिक तुळशीदास काणकोणकर, सरपंच अजित बकाल, माजी सरपंच प्रेमनाथ नाईक, चित्ररथ कलाकार अभिजित शिरोडकर, तसेच संस्थेचे सचिव रामा कुर्टीकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बालकलाकारांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
काणकोणकर, शिरोडकर यांचा सत्कार
मान्यवरांकडून साहित्यिक तुळशीदास काणकोणकर तसेच कलाकार अभिजित शिरोडकर यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. समई प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष मोहन कुर्टीकर यांनी अहवाल वाचन केले. संस्थेच्या सदस्यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष मोहन कुर्टीकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी बालकलाकारांना प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्याही कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. आजची लहान मुले मोबाईलकडे जास्त वेळ वाया घालवतात. त्यामुळे मानसिक, शारीरिक परिणाम होतात. मुलांवर सदोदीत पालकांचं लक्ष असावं. मुलांना मोबाईल दिला तरी त्याला लॉक घालायला देऊ नका. लॉक घालणं म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या लोकांपासून काहीतरी लपविणंही असू शकतं, असे राजू नाईक यांनी सांगितले. तुळशीदास काणकोणकर, गोविंद शिरोडकर, सरपंच अजित बकाळ, माजी सरपंच प्रेमनाथ नाईक या मान्यवरांनी आपले विचार मांडले.
बाल कलाकारांचा सन्मान
नाटय़ दिग्दर्शक कबीर दत्ताराम फडते, संगीत दिग्दर्शक समीर परब, तबलवादक संजय सातू नार्वेकर, निर्मिती प्रमुख मोहन रेसू कुर्टीकर, बालकलाकार वेदिका हरी शिरोडकर, प्रतीक्षा पूर्णानंद बकाल, रश्मी सुशांत बकाल, विरजा काशिनाथ नाईक, मंजीता जगदीश बकाल, गायत्री कुर्टीकर, सीमा राजू चोडणकर, वंशिका वामन चोडणकर, नेहा महेंद्र शिरोडकर, ऋतुजा भानुदास नाईक, सान्विक संजय शिरोडकर, साईदिप बाजीराव शिरोडकर, सिद्धीक बाजीराव शिरोडकर, दक्ष देवानंद कुर्टीकर या कलाकारांचा गौरव करण्यात आला.
दहावीच्या गुणवंतांचा गौरव
एसएससी परीक्षेत विशेष श्रेणीत पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये सदीन समीर कुर्टीकर, सिया समीर कुर्टीकर, प्रज्ञा देविदास शिरोडकर, आर्यन अनिश बकाल यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष मोहन कुर्टीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.