ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेची साडेसतरा लाखाची केली फसवणूक
वार्ताहर/ ताम्हाने
ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था, शाखा देवरुखची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई-डोंबिवली येथील राणे होम्स बिल्डर्सवर देवरुख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जयसिंग राणे असे त्या बिल्डर्सचे नाव आहे. 17 लाख 65 हजार 302 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबतची फिर्याद ब्राह्मण हितवर्धिनी बिगरशेती सहकारी पतसंस्था शाखा देवरुखचे शाखाधिकारी जयेश विलास जोशी यांनी दिली. या फिर्यादीत आरोपी जयसिंग गोपाळराव राणे, प्रोप्रा. राणे होम्स बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स यांच्याविरोधात 17 लाख 65 हजार 302 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंग राणे यांनी ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्था शाखा, देवरुखमध्ये जात आपण राणे होम्स बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स असल्याचे सांगत विश्वास संपादन केला व पतसंस्थेकडे नवीन वाहन तारण कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी 15 लाख रुपये कर्जासाठी संस्थेला आवश्यक असणारी कागदपत्रे (दस्तऐवज) खोटी व बनावट तयार करुन ती खरी आहेत, असे भासवले आणि ती कागदपत्रे कर्ज मंजुरीसाठी पतसंस्थेमध्ये जमा करुन कर्ज मंजूर करुन घेतले. त्या कर्जाच्या नियमाप्रमाणे आजपर्यंत 17 लाख 65 हजार 302 रुपये व्याजासह परतफेड न करता फसवणूक केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
तसेच संस्थेकडून मंजूर झालेल्या कर्जामधून खरेदी केलेल्या वाहन तारण वाहनाची रजिस्ट्रेशन कागदपत्रे जमा केलेली नाहीत. याबरोबरच गाडीचे हप्ते संस्थेमध्ये गाडी घेतल्यापासून आजपर्यंत जमा केलेले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी याने संस्थेची दिशाभूल करुन पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंग राणे यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 199, 200, 193 (2), 405, 406, 415, 417, 420, 421, 422, 427, 464, 467, 468, 469 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जुलै 2015 ते 19 ऑगस्ट या कालावधीत हा गुन्हा घडला आहे. या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करत आहेत.