प्रतिनिधी / मुंबई
एका बंगल्यातुन लाखोंची घरफोडी तर दुसऱ्या बंगल्यात ऐवज हाती न लागल्याने सामानाची नासधूस
कल्याण – डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात असलेल्या सर्वत्र अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरण्याचा सपाटा लावणाऱ्या चोरट्यांनी मिलापनगरमधील दोन बंगल्यांना लक्ष केले. एका बंगल्यात घबाड सापडले, मात्र तर अन्य बंगल्यातून हाती काहीही न लागल्याने तेथिल सामानाची नासधूस करून चोरटे पसार झाले .
मिलापनगरमध्ये चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र सुरूच असताना येथील अष्टक बंगलो सोसायटीतील प्लॉट क्र. R L – 100 मधील दोन बंद बंगल्यांत घुसून चोरांनी तेथिल ऐवजावर डल्ला मारला. सतीश ढगे यांच्या घरातून 38 तोळे सोन्याचे दागिने, एक एलईडी टीव्ही असा लाखो रुपये किंमतीचा ऐवज लांबविला. तर शेजारील दुसऱ्या बंगल्यात चोरट्यांच्या हाती काहीच किंमती ऐवज न मिळाल्याने संतापलेल्या चोरट्यांनी तेथिल सामानाची नासधूस केली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनच दिवसांपूर्वी याच मिलापनगरमध्ये घरफोडीचा प्रयत्नात चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यावेळी सदर चोर हे वाहनाने आल्याचे दिसत होते. त्यावेळी चोरांनी सीसी कॅमेरावर स्प्रे मारून त्यात आपण दिसणार नाही याची खबरदारी घेतली होती. सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्याची छबी हाती लागली असली तरी तीन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती मात्र काहीच लागलेले नसल्याचे दिसून येते. मिलापनगरमध्ये लॉकडाऊन काळात अनेक घरफोडीचे प्रयत्न झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी येथील रहिवाश्यांकडून मागणी होत आहे. विशेष म्हणजे मिलापनगरच नव्हे तर अनेक भागात काही स्ट्रीटलाईट बंद आहेत. त्याचाही चोरट्यांना फायदा होतो. त्यामुळे प्रशासनाने या भागातील स्ट्रीटलाईट चालू कराव्यात अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी केली