प्रतिनिधी/ नवारस्ता
चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱहाडीने घाव घालून तिचा निर्घृण खून केल्याची घटना पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक गावात मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास घडली. संशयित आरोपी पतीच्या विरोधात पाटण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असल्याची माहिती पाटणचे प्रभारी सपोनि एम. एस. भावीकट्टी यांनी दिली.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, दिवशी बुद्रुक येथील उत्तम सखाराम महापुरे यांची पत्नी, मुले, सुना, पुणे येथे राहतात. उत्तम महापुरे हा आपल्या व गावाकडेच म्हणजे दिवशी बुद्रgक येथे एकटा राहात होता. महापुरे कुटुंबांची गावात दिवशी बुद्रुक येथे व लक्ष्मीनगर वस्ती अशी दोन घरे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सर्वजण गावाकडे दिवशी बुद्रुक येथे रहावयास आले आहेत. हे सर्व जण लक्ष्मीनगर येथील घरात वास्तव्यास होते.
मंगळवार 25 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उत्तम महापुरे याने झोपेत असलेल्या आपली पत्नी सौ. सावित्रीबाई उत्तम महापुरे (वय 50) हिच्या डोक्यात कुऱहाडीने घाव घातले. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वजण खडबडून जागे झाले. मात्र घाव वर्मी बसल्याने सावित्रीबाई महापुरे गंभीर जखमी होऊन निपचित पडल्या. हल्ल्याच्या घटनेनंतर झालेल्या आरडाओरडय़ाने शेजारचे लोक धावून आले. युवकांनी तातडीने जखमी सावित्रीबाई महापुरे यांना तात्काळ कराड येथे उपचारासाठी हलविले, मात्र कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान यातील संशयित आरोपी उत्तम सखाराम महापुरे घटनेनंतर गावातून फिरत होता. हल्ला करूनही त्याला कोणतेच दुःख नव्हते. उलट आपली पत्नी साविला खून करून वर पाठविले आहे, असे सांगत सुटला होता. उत्तम महापुरे याच्या विकृत स्वभावाची माहिती सर्वांना असल्याने कोणाला खरे वाटले नाही. मात्र घडलेल्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे अनेकांनी धाव घेतली असता दुर्दैवी सावित्री लक्ष्मीनगर येथील घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उपस्थित युवकांनी तात्काळ जखमी सावित्री यांना कराड ला रुग्णालयात हलविले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
दरम्यान, या घटनेची फिर्याद मयत सावित्रीबाई महापुरे यांचा मुलगा निवास उत्तम महापुरे याने पाटण पोलिसात दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी उत्तम महापुरे याला पाटण पोलिसांती ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास सपोनि एम. एस. भावीकट्टी करत आहेत.