लांजा तालुक्यातील पुनस बौद्धवाडी येथील घटना
प्रतिनिधी/ लांजा
अल्पवयीन मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून खून केल्याची घटना सोमवारी 21 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पुनस बौद्धवाडी येथे घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर लांजा पोलीस ठाण्यात मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती तालुक्यातील पुनस बौद्धवाडी येथील रहिवासी असून पुनस ग्रामपंचायतीत पाणी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. ते पत्नीवर चारित्र्यावर सतत संशय घेत असत. त्याचप्रमाणे मुलाला तू माझा मुलगा नाहीस, असे वारंवार बोलून हिणवत असत. प्रत्येक वेळी ते भांडण करून त्याला अशाप्रकारे बोलत असत. 21 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मृताचे पत्नीशी भांडण झाले. यावेळी त्याने मुलाला तू माझा मुलगा नाहीस, असे हिणवले. याचा राग येवून मुलाने घरातील लोखंडी हातोडा घेवून वडीलांच्या डोक्यावर मागील बाजूने जोरदारपणे प्रहार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.
यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रात्री रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मानव साळोखे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुलावर भा.द.वि. कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात केला होता. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी मृताचा 21 मार्च रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांच्या मृत्यू प्रकरणी लांजा पोलिसांनी मुलावर भा.द.वि.कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटने प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे करीत आहेत….