गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
भारतात आम्ही महिलांना डोक्यावर मातीची भांडी घेऊन चालताना पाहिले आहे. ही कला काही लोकगीतांमध्येही दिसून येते. पण अशाप्रकारचे दृश्य आता विदेशातही दिसून आले आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या डोक्यावर एक किंवा दोन नव्हे तर 700 हून अधिक अंडी ठेवून संतुलन साधले आहे. अंडय़ांसह संतुलन साधणे अजिबात सोपे नसते, कारण किंचित चूक झाल्यास सर्व अंडी फुटण्याचा धोका असतो. अशा स्थितीत या व्यक्तीने विश्वविक्रम रचला आहे.
स्वतःच्या टोपीवर सर्वाधिक अंडी ठेवून संतुलन साधण्यासाठी व्यक्तीचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाले आहे. पश्चिम आफ्रिकेच्या बेनिन येथील रहिवासी ग्रेगोरी डा सिल्वाने स्वतःच्या डोक्यावर 735 अंडी ठेवून संतुलन साधण्याचा विश्वविक्रम केला. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत पेजवरून ग्रेगोरीची चित्रफित शेअर करण्यात आली आहे. चित्रफितीत तो अंडय़ांसह संतुलन साधताना आणि गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्रासोबत दिसून येतोय.
ग्रेगोरीने केवळ एका टोपीवर सर्वाधिक 735 अंडी उचलली आहेत. स्वतःच्या टोपीवर एवढय़ा मोठय़ा संख्येत अंडय़ांना रचण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला आहे. ग्रेगोरीने चीनमध्ये सीसीटीव्हीसाठी जीडब्ल्यूआर स्पेशल शोमध्ये ही कामगिरी करून दाखविली आहे.
ग्रेगोरीची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल होत असून आतापर्यंत 60 हजारांहुन अधिक लोकांनी लाइक केले आहे. सोशल मीडियावर ग्रेगोरीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. एका युजरने ग्रेगोरीकरता ‘एगसेलेंट’ हा शब्द वापरला आहे.