नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी फोनवरून चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान भारत-चीन सीमा वाद आणि जी-7 समवेत अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली आहे. ट्रम्प यांनी मोदींना आगामी जी-7 परिषदेत सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे.
माझे मित्र ट्रम्प यांच्यासोबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. जी-7 परिषदेच्या अध्यक्षत्वासंबंधी त्यांच्या योजना आणि कोरोना संकटावर चर्चा केली आहे. भारत आणि अमेरिका यांचे दृढ संबंध कोरोनानंतरच्या जगासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मोदींनी ट्विट करत म्हटले आहे. पंतप्रधान आणि अमेरिकेच्या अध्यक्षांदरम्यान झालेल्या चर्चेत द्विपक्षीय मैत्रिपूर्ण संबंध आणि परस्पर सन्मानाचे चित्र दिसून आले. अध्यक्ष ट्रम्प यांनी जी-7 ची व्याप्ती वाढविण्याची इच्छा व्यक्त करत भारतासह अन्य काही महत्त्वाच्या देशांना यात सामील करण्याचा विचार व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या या दूरदर्शीपणाचे कौतुक केले आहे. भारत या परिषदेला यशस्वी करण्यासाठी अमेरिका आणि अन्य देशांसोबत मिळून काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले आहे. जी-7 हा सात मोठय़ा अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा एक गट आहे. यात फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका सामील आहे. ग्रूप ऑफ सेव्हन असेही याला म्हटले जाते. दरवर्षी या संघटनेची परिषद आयोजित केली जाते.