ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराची तारीख बदलली आहे. अमेरिकेत 19 जूनला ‘जूनटींथ हॉलिडे’ साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवसाच्या सन्मानासाठी त्यांनी ही तारीख बदलली आहे. आता निवडणूक रॅली 20 जूनला सुरू होणार आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीमुळे अमेरिकेतील लोक नाराज आहेत. त्यातच कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव, कोरोनामुळे वाढलेली मृतांची संख्या आणि जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येनंतरचे हिंसक आंदोलन यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ट्रम्प यांच्यासाठी सोपी राहिली नाही. अमेरिकेतील नागरिकांमध्ये ट्रम्प यांच्याविषयी असंतोष वाढत असल्याने ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ट्रम्प सुरुवातीच्या टप्प्यात टेक्सास, फ्लोरिडा, एरिजोना आणि उत्तर कॅरोलिनामधील सभांना संबोधित करणार आहेत.
या निवडणुकीतही ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेवर निवडणूक लढवणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.