वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :
अमेरिकेच्या संसदेतील वरिष्ठ सभागृहात बुधवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाभियोगाच्या सर्व आरोपांमधून मुक्त झाले आहेत. सत्तेचा दुरुपयोग करणे आणि काँग्रेसच्या कामकाजात अडथळा आणल्याच आरोप ट्रम्प यांच्यावर होता. सिनेटमध्ये रिपब्लिकन्सचे (ट्रम्प यांचा पक्ष) आहे. सत्तेच्या दुरुपयोगाचा ट्रम्प यांच्यावरील आरोप 52 विरुद्ध 48 मतांनी फेटाळला गेला. तर काँग्रेसच्या कामकाजात अडथळे आणल्याचा आरोप 53 विरुद्ध 47 मतांनी रद्द झाला आहे.
महाभियोगाच्या संकटातून बाहेर पडणारे अमेरिकेच्या इतिहासातील ट्रम्प हे तिसरे अध्यक्ष ठरले आहेत. उटाहचे सिनेटर मिट रोमनी या एकमात्र रिपब्लिकनने ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले आहे. पण रोमनी यांनी काँग्रेसच्या कामकाजात अडथळे आणल्याचा ट्रम्प यांच्यावरील आरोप नाकारला आहे.
ट्रम्प आरोपमुक्त
सिनेटकडून आरोपमुक्त झाल्यावर व्हाइट हाउसच्या प्रवक्त्यान स्टेफनी ग्रीशम यांनी भूमिका मांडली आहे. अध्यक्ष ट्रम्प यांना सर्व आरोपांपासून मुक्ती मिळाली आहे. एक प्रकारे ही सत्तेची पुनर्स्थापनाच आहे. डेमोक्रेट्सचे लाजिरवाणे वर्तन भूतकाळात जमा झाले आहे. महाभियोग प्रक्रियेद्वारे आगामी अध्यक्षीय निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी डेमोक्रेट्सच्या विरोधात कारवाई केली जाऊ नये का असे प्रश्नार्थक विधान ग्रीशम यांनी केले आहे.
डेमोक्रेट्सचा प्रस्ताव
18 डिसेंबर रोजी कनिष्ठ सभागृह म्हणजेच प्रतिनिधीगृहात ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला गेला होता. 2020 मधील डेमोक्रेटिक पार्टीचे संभाव्य उमेदवार ज्यो बिडन आणि त्यांच्या पुत्राच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडीमिर जेलेंस्की यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप ट्रम्प विरोधात होता. बिडेन यांचे पुत्र युक्रेनच्या एका ऊर्जा कंपनीत कार्यरत आहेत. ट्रम्प यांनी स्वतःच्या राजकीय लाभासाठी युक्रेनला दिली जाणारी आर्थिक मदत रोखल्याचाही आरोप होता.
3 शतकांमध्ये 3 महाभियोग
अमेरिकेच्या 243 वर्षांच्या इतिहासात कुठल्याही अध्यक्षाच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला जाण्याची ही तिसरी वेळ आहे. 19 व्या शतकात अँड्रय़ू जॉन्सन, 20 व्या शतकात बिल क्लिंटन यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता. या दोन्ही अध्यक्षांच्या दुसऱया कार्यकाळात हा प्रकार घडला होता. तर ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातच महाभियोग प्रस्ताव आणला गेला आहे.
महाभियोगाचा इतिहास
-17 वे अध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टीचे नेते जॉन्सन यांच्या विरोधात गुन्हे आणि गैरवर्तनाचे आरोप असलेला महाभियोगाचा प्रस्ताव प्रतिनिधिगृहात संमत झाला होता. सिनेटमध्ये जॉन्सन यांना समर्थन मिळाल्याने त्यांचे अध्यक्षपद बचावले होते.
– 42 वे अध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पार्टीचे नेते बिल क्लिंटन यांना ज्युरीसमोर खोटी साक्ष देणे आणि न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी महाभियोगाला तोंड द्यावे लागले हेते.
-1974 मध्ये अध्यक्ष निक्सन यांच्यावर राजकीय विरोधकाची हेरगिरी करविल्याचा आरोप होता. पण महाभियोगापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. सिनेटमध्ये विरोधकांचे बहुमत असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले होते.