समर्थकाचा प्रताप, डोळय़ावर काळी पट्टी बांधून चालविली स्कुटी
तामिळनाडूत मतदारांना आकर्षित करण्याठी राजकीय पक्षांकडून विविध मार्ग अवलंबिले जात आहेत. पण चेन्नईत अण्णाद्रमुकचे उमेदवार आणि राज्याचे मंत्री एस.पी. वेलुमनी यांच्या समर्थकाने मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तोंडावर काळी पट्टी बांधून घेत अनेक किलोमीटर अंतरापर्यंत दुचाकी चालविली आहे. काळय़ा पट्टीने डोळय़ांसह पूर्ण चेहराही झाकला गेला होता.
वेलुमीन यांचे समर्थक युएमटी राजानुसार तामिळनाडूत अण्णाद्रमुक सरकारच्या कामगिरीसंबंधी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी डोळय़ांवर कापड बांधून दुचाकी चालविली आहे. मंत्री असताना वेलुमनी यांनी किती चांगले काम केले आहे हे दाखविण्याचा यामागे उद्देश होता असे सांगण्यात आले.
10 वर्षांपूर्वी रस्त्यांवर डोळे उघडे ठेवून चालणेही अवघड होते, पण अण्णाद्रमुक सरकारने सुशासन, चांगले रस्ते आणि उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध केल्याने डोळय़ांवर पट्टी बांधूनही वाहन चालविले जाऊ शकते असा दावा राजाने केला आहे.
यंदाच्या तामिळनाडू निवडणुकीत उमेदवार आणि त्यांचे समर्थक नवनव्या प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण डोसा तयार करत आहेत, तर कुणी मतदारांचे कपडे धुत आहे. कुणी रस्त्यावर सिंबलम मार्शल आर्टचे प्रदर्शन करत आहे.