64 वर्षीय चिनी महिलेत रिकव्हरीच्या 2 महिन्यांनी डोळय़ात आढळला कोरोना : दोनवेळा करावी लागली शस्त्रक्रिया
चीनमध्ये कोरोनाचे आणखी एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. 64 वर्षीय महिला कोरोना संसर्गातून बरी झाली होती, परंतु 2 महिन्यांनी कोरोना विषाणू तिच्या डोळय़ांमध्ये आढळून आला आहे. चीनमध्ये हे प्रकरण मोठय़ा प्रमाणावर चर्चेत आहे. डोळे लाल झाल्यास किंवा सूज दिसून आल्यावर सतर्क होण्याची गरज असल्याचे अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. ही कोरोना संसर्गाची लक्षणे असू शकतात.
जानेवारीमध्ये बाधित
सलग 5 दिवसांपर्यंत कोरडा खोकला आणि 9 दिवसांपर्यंत अतिसाराची लक्षणे दिसून आल्यावर महिलेला 31 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित महिलेला तापही आला होता. छातीचे सीटी स्कॅन केल्यावर फुफ्फुसांमध्ये संसर्गाचा प्रभाव दिसून आला. यानंतर तिच्या नाकातून द्रावनमुना घेत चाचणी केली असता कोरोनाची पुष्टी मिळाली होती. परंतु त्यादरम्यान कुठलीच गंभीर समस्या दिसून आली नाही तसेच डोळय़ांमध्ये कुठलीच समस्या नव्हती.
फेब्रुवारीत डिस्चार्ज
18 आणि 20 जानेवारी रोजी झालेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर तिला डिस्चार्ज करण्यात आले होते. सुमारे 8 दिवसांनी तिच्या उजव्य डोळय़ात वेदना होण्यास प्रारंभ झाला. 28 फेब्रुवारीपर्यंत डोळय़ांमधील वेदना सातत्याने वाढत राहिली आणि कमी दिसू लागले. वेदना सहन करणे अवघड झाल्यावर महिला पुन्हा रुग्णालयात पोहोचली होती. 8 मार्च रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला ग्लूकोमा अटॅकला तोंड देत असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. डोळय़ांमधील दबावामुळे वेदना होत होत्या. पूर्वी औषधांच्या मदतीने वेदना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अधिक फायदा न झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली.
डोळय़ांवर दोनदा शस्त्रक्रिया
चीनच्या वुहान येथील सेंटर थिएटर कमांड हॉस्पिटलमध्ये महिलेवर दोनवेळा शस्त्रक्रिया पार पडली आहे. 14 मार्च रोजी उजव्या तर 15 मार्च रोजी डाव्या डोळय़ाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतरही डोळय़ांमध्ये सातत्याने ताण आणि वेदना वाढल्याने महिलेवर 10 एप्रिल रोजी पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान डोळय़ांमधून घेण्यात आलेल्या टिश्यू सॅम्पलची चाचणी करण्यात आली असता त्यात कोरोना विषाणूचा प्रोटीन आढळला.
संक्रमण शक्य
कोरोनाच्या रुग्णांमध्ये ‘ऑक्युलर मेनिफेस्टेशन’ची प्रकरणे दिसून आली आहेत. अशा प्रकरणांमध्ये डोळे लाल होणे आणि सूज येते, असे जामा ऑप्थेल्मोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात नमूद करण्यात आले आहे. कोरोना डोळय़ांच्या वरील भागासोबतच अश्रूंमध्येही आढळला आहे आणि तो तेथूनही संक्रमण फैलावू शकतो असे यापूर्वी झालेल्या एका संशोधनात दिसून आले आहे.