कपिलेश्वर कॉलनी परिसरातील घटनेने खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
कोल्हापूरहून बेळगावात आलेल्या एका व्यावसायिकाच्या डोळय़ात मिरचीपूड टाकून त्यांच्याजवळील 10 लाख रुपयांची बॅग पळविण्यात आली आहे. बुधवारी रात्री कपिलेश्वर कॉलनी परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. बॅग पळविणारे भामटे मोटारसायकलवरून पसार झाले आहेत.
मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून मोटारसायकलवरून येवून 10 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग पळविणाऱया भामटय़ांचा शोध घेण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार कोल्हापूर येथील राजेश पटेल हे बुधवारी बेळगावात आले होते. तत्पूर्वी हुबळी येथे व्यवसायासंबंधी 8 लाख रुपये व हिरेबागेवाडी येथे 2 लाख रुपये असे एकूण 10 लाख वसूल करून ते बेळगावात दाखल झाले होते. कपिलेश्वर कॉलनी परिसरात एका परिचिताला भेटण्यासाठी आले होते. तेथून पैशांची बॅग घेऊन चालत बसस्थानकाकडे जाताना ही घटना घडली आहे.
बसस्थानकाकडे चालत जात असताना मोटारसायकलवरून दोघेजण आले. पाठीमागे बसलेला भामटा खाली उतरला. राजेश यांच्या डोळय़ात मिरचीपूड टाकली. त्यानंतर तातडीने त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेऊन दोघेजण मोटारसायकलवरून तेथून फरारी झाले. चोऱया, घरफोडय़ा, चेन स्नॅचिंगच्या घटनांनी बेळगावकर हैराण झाले आहेत. तोच डोळय़ात मिरचीपूड टाकून पैशांची बॅग लांबविणाऱया टोळीनेही आपल्या कारवाया सुरू केल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.