जगाला कोरोना महामारीच्या खाईत लोटणाऱया चीनची लबाडी उघडी पाडण्याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी होती. कोरोना विषाणूच्या फैलावानंतर चीनच्या विरोधात सर्व जगाने दंड थोपटून उभारण्याची हीच वेळ असल्याचे जणू संकेतच यातून मिळत होते. ठकास-महाठक या न्यायाने ड्रगनला जाब विचारण्याची जबाबदारी आता अमेरिकेनेच घेतली हे बरे झाले! कोविड-19 निमित्ताने चीनविरोधात सुरु असलेल्या लढाईत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीने अमेरिकन सिनेटमध्ये बुधवारी एक महत्त्वपूर्ण विधेयक मांडले आहे. कोरोना फैलाव रोखण्यास व कोरोनाप्रकरणी अमेरिकेच्या चौकशीला सहकार्य न दिल्यास चीनवर निर्बंध लादण्याचे संपूर्ण अधिकार या विधेयकानुसार ट्रम्प यांना देण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून ट्रम्प यांनी सातत्याने जागतिक साथीच्या रोगाबाबत चीनलाच जबाबदार धरले आहे. तिरस्कारयुक्त वक्तव्यातून ते चिनी राग आळवत असून कोरोना विषाणूचा चिनी व्हायरस असा ते कुचेष्टेने उल्लेखही करतात. चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांचे तोंड पाहण्याची देखील इच्छा नसल्याचे मत त्यांनी अलीकडे व्यक्त केले आहे. जगातील दुसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनसोबत प्रसंगी संबंध तोडण्याची भाषा ते करत आहेत. ‘कोविड-19 उत्तरदायित्व कायदा’च्या निमित्ताने चीनवर कोरोना महामारीची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. परिणामी चीनला कोरोनाप्रकरणी आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याची रणनीती अमेरिका आखत आहे. दुसऱया बाजूला भारत, इस्राईल, दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील यांच्यासोबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पाँम्पियो यांनी बैठक आयोजित केली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने चीनवर जबाबदारी निश्चित करण्याच्या डावपेचाचा हा भाग आहे. अमेरिकेने भारत, जपान, व्हिएतनाम यांच्याशी अलीकडच्या काळात जवळीकही वाढवली आहे. कोविड-19 उत्तरदायित्व कायद्याच्या माध्यमातून ट्रम्प यांना बरेचसे अधिकार मिळणार आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाप्रकरणी खुद्द अमेरिकाच चीनची चौकशी करेल. विषाणूचा उद्रेक वुहान प्रयोगशाळेतून झालेला नसून तो मांसविक्री बाजारातून झाल्याचा दावा चीन सातत्याने करीत आला आहे. या कायद्याचा वापर करुन चीनमधील वादग्रस्त मांसविक्री बाजार ट्रम्प बंद करु शकतील. चीनसोबतचा व्यापार तसेच पर्यटनावर ते निर्बंध लादू शकतील. व्हिसाबंदी त्याचप्रमाणे चीनसोबत व्यापारी संबंध ठेवण्यास अमेरिकन कंपन्यावर ते मनाई आणू शकतील. याउलट चिनी कंपन्यांवर अमेरिकेत बंदी घालू शकतील. एका दुबळय़ा परंतु जगाचे अर्थचक्र थांबवण्याचे सामर्थ्य असणाऱया विषाणूपुढे संपूर्ण जग हतबल झाले असताना आजही चीनच्या चेहऱयावर आपल्या कृत्याबाबत जराही पश्चातापाची रेष दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूमागील अंतिम सत्य शोधण्यासाठी चीनवर कोणीतरी दबाव टाकणे आवश्यक होते. छोटय़ा आणि दुबळय़ा राष्ट्रांना आर्थिक पंजात पकडून दादागिरी करण्यात पटाईत असणाऱया चीनने वुहान प्रयोगशाळेत चौकशीसाठी परवानगी मागणाऱया आंतरराष्ट्रीय समुदायालाही नकार देण्याचा उद्दामपणा दाखवला. वास्तविक, चीनला चौकशीच्या पिंजऱयात खेचल्याशिवाय तो सहकार्य करणार नाही, हे उघड सत्य आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव न टाकल्यास ही मोठी घोडचूक ठरली असती. विषाणूमुळे घायकुतीला आलेल्या असंघटित राष्ट्रांच्या परिस्थितीचा फायदा उठवत चीन कोणालाच भीक घालत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वास्तविक, कोविडबाबत फार मोठे सत्य दडपून चीनने जगाचा विश्वासघात केला आहे. या विषाणूबाबत वेळीच गांभीर्य ओळखून जगाला सावध केले असते अथवा योग्य त्या उपाययोजना केल्या असत्या तर आज अब्जावधी लोकांना या भयाण वास्तवाला सामोरे जावे लागले नसते, हे सत्य आहे. जाणीवपूर्वक कुटिल पद्धतीने जगाला अंधारात ठेवून आपल्या कृष्णकृत्यावर पांघरुण घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परिणामी, संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये अडकले. म्हणूनच चीनवर कठोर कारवाई करावी असा दबाव गेल्या कित्येक दिवसांपासून ट्रम्प यांच्यावर वाढत आहे. चीनमध्ये डिसेंबर व जानेवारीच्या सुरुवातीला सतराशेहून अधिक वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाला असताना या आजारामध्ये मानवी संसर्ग होण्याचा धोका अत्यंत कमी असल्याचे 15 जानेवारीला टीव्हीवर जाहीर करण्याचा निर्लज्जपणा दाखवून जगाची दिशाभूल केली. अनेक पुरावे नष्ट केले. मृतांची खोटी आकडेवारी जाहीर केली. चीनच्या या बेफिकिरीची सर्वाधिक किंमत अमेरिकेला मोजावी लागली आहे. चीनची बदमाशगिरी उघड होत असताना आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या जागतिक पेचप्रसंगाला ट्रम्प मात्र धीम्यागतीने सामोरे जात असल्याचा आरोप ट्रम्प यांच्या टीकाकारांकडून होत आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये ट्रम्प यांना निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या कारभाराची फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे. चीन दोषी आहे यात संदेह नाही परंतु हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात ट्रम्प यांना अपयश आले आहे. चीनबरोबर ट्रम्प प्रशासनाच्या कार्याची छाननी होणे आवश्यक असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील निवडणुकांतर्गत राजकारण आणि आरोप प्रत्यारोपाचा भाग सोडला तर चीनच्या अक्षम्य बेपर्वाईमुळे लाखो लोकांचा बळी गेला व जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा बसला, हे वास्तव नाकारता येत नाही. या सर्व नुकसानीबाबत चीनला जबाबदार धरले पाहिजे, असा मोठा मतप्रवाह आहे. वास्तविक, ट्रम्प यांना कोविड-19 उत्तरदायित्व कायद्यानुसार धारदार हत्यार मिळाले आहे. यामुळे ड्रगनला ठेचत त्यांनी जागतिक मताचा आदर करावा व या कायद्यातील अधिकाराचा वापर करुन कोरोनाबाबतचे संपूर्ण वास्तव जगासमोर आणावे, अशी अपेक्षा आहे. चीनने स्वार्थासाठी व स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती दडवून ठेवली. जागतिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेबाबत बेफिकिरी दाखवली. या त्यांच्या खोटेपणाबद्दल चीनला शिक्षा मिळालीच पाहिजे.
Previous Articleअपहरण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Next Article त्या महिलेच्या संपर्कात 45 हून अधिक जण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.