सँडलवूडमधील अनेक नट-नटय़ांची नावे चर्चेत आल्यामुळे ड्रगमाफियांचे नाव सर्वतोमुखी झाले आहे. संदीप पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱयाकडे तपासाची जबाबदारी आहे. सरकारनेही या प्रकरणाच्या तपासात कणखरपणा बाळगला आहे. त्यामुळे ड्रगमाफियांची पाळेमुळे बाहेर पडतील ही अपेक्षा आहे.
गेल्या एक आठवडय़ापासून कर्नाटकात ड्रगमाफिया आणि सँडलवूडमधील चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींच्या नशेबाजपणाची चर्चा सुरू आहे. राजधानी बेंगळूरसह राज्यात ड्रगमाफिया कसा फोफावला आहे, याचा तपास सुरू आहे. सीसीबीचे प्रमुख संदीप पाटील यांच्यावर या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आहे. संदीप पाटील हे एक प्रामाणिक आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून त्यांनी उत्तमरित्या सेवा बजावली आहे. अशा प्रामाणिक अधिकाऱयाकडे तपासाची जबाबदारी आहे. गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनीही ड्रगमाफियांची पाळेमुळे खणून काढण्याची सूचना पोलीस अधिकाऱयांना दिली आहे. गेल्या गुरुवारी बेंगळूर येथे डी. अनिका, एम. अनुप, आर. रविंद्रन या त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे. अनिका ही महिला सध्या तपासाची केंद्रबिंदू असली तरी अनेक नट-नटय़ा, राजकीय नेत्यांची मुले अमली पदार्थांचे सेवन कसे करतात, मध्यरात्री नशेत नाचगाणे कसे चालते, खासकरून चित्रपट व्यवसायातील काही नशेबाज अशा पाटर्य़ांमध्ये कसे भाग घेतात, हे हळूहळू समोर येऊ लागले आहे.
दिग्दर्शक इंद्रजित लंकेश यांनी सीसीबी अधिकाऱयांना पंधराहून अधिक नट-नटय़ांची यादी व बेंगळुरात नशेचा व्यवहार कसा चालतो याची माहिती दिली आहे. सोमवारी सीसीबीने नोटीस देऊन त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. गुरुवारी त्यांची चौकशी झाली आहे. आपण या प्रकरणाचे साक्षीदार आहोत, असे गृहित धरू नका. माहितीदार आहे, असे समजून आपल्याकडून माहिती घ्या व ड्रगमाफियांची पाळेमुळे खणून काढा, अशी मागणी इंद्रजित लंकेश यांनी केली आहे. कर्नाटक फिल्म चेंबरने तातडीची बैठक घेऊन सँडलवूडमध्ये तशी परिस्थिती नाही. एक-दोघे जण अमली पदार्थ सेवन करीत असतील तर संपूर्ण सँडलवूडला बदनाम करणे योग्य नाही, असे सांगत चेंबरने नाराजी व्यक्त केली आहे. अनेक अभिनेत्यांनीही सँडलवूडमध्ये ड्रग्जचे प्रमाण ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे त्या पद्धतीने नाही, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन महिन्यांपूर्वी अकाली निधन झालेल्या चिरंजीवी सर्जा यांच्या नावाचीही ठळक चर्चा सुरू आहे. चिरंजीवी आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव या प्रकरणात ओढू नये, अशी मागणी अनेक ज्ये÷ अभिनेत्यांनी केली आहे.
कर्नाटकात ड्रगमाफिया आताच सक्रिय आहे, असे नाही. पूर्वी केवळ गांजाची विक्री सर्वत्र केली जायची. आता कोकेन, ब्राऊनशुगर, मारिजुआना, एलएसडी, एमडीएमए आदी अमली पदार्थांचा पुरवठा व विक्री होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईशी ड्रगमाफियांचे नाते कायम आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा ही साखळी ड्रगमाफियांसाठी पूर्वीपासूनच अनुकूल अशी आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी बेळगावातून डझनभर देशांना अमली पदार्थ पुरवठा केला जात होता. बेळगाव पोलिसांनी मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. सध्या या रॅकेटचा सूत्रधार आकाश देसाई व त्याचे काही साथीदार कारागृहात आहेत. न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली आहे. गोव्याला तर रोजच्या रोज टिफीन कॅरियरमधून अमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता. देवदेवतांच्या फोटो प्रेममधून अमली पदार्थ पुरविण्याची नामी शक्कल लढविण्यात आली होती. पोलीस, राजकीय नेते व ड्रगपेडलर यांच्यातील नात्याची तेव्हाही चर्चा होती आणि आताही ठळक चर्चा होऊ लागली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरेही कर्नाटकात पोहोचले आहेत. कर्नाटकातील एका आमदाराचे नाव या प्रकरणात ठळक चर्चेत आले आहे. तो आमदार कोण याचा अद्याप उलगडा झाला नाही.
आमदाराच्या गाडीतून गोव्यात ड्रग्जतस्करी केली जात होती, अशी माहिती गौरव आर्याच्या चौकशीतून उघडकीस आली आहे. पोलीस, राजकीय नेते व ड्रगमाफिया यांच्यातील ताजे संबंध लवकरच उघडकीस येणार आहेत. मुंबई व बेंगळूरसह कर्नाटकात या माफियांची पाळेमुळे खणण्याचे काम पोलीस अधिकाऱयांनी हाती घेतले आहे. कर्नाटकातील अभिनेत्री रागिणी द्विवेदी, संजना, शर्मिला मांडरे आदींची नावे या प्रकरणात ठळक चर्चेत आली आहेत. यापैकी काही अभिनेत्रींना नोटीस देऊन सीसीबीने चौकशीसाठी बोलाविले आहे. नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) व सीसीबी (सिटी क्राईम बँच) मधील अधिकारी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची कसून चौकशी सुरू आहे. तिच्या चौकशीतूनच कर्नाटकातील ड्रगमाफियांचे कारनामे उघडकीस आल्याची माहिती मिळाली आहे. जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम, नायजेरियासह वेगवेगळय़ा देशातून कर्नाटकात अमली पदार्थांचा पुरवठा कसा होतो, या जाळय़ात नायजेरियन नागरिकांचा सहभाग कशा पद्धतीने आहे याची पाळेमुळे खणण्याचे काम सुरू आहे. खास करून तरुणाई व विद्यार्थ्यांना नशेच्या खाईत लोटण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकात हे रॅकेट कार्यरत आहे.
शिक्षण संस्थांमध्ये अमली पदार्थांचे जाळे कार्यरत असल्याचे उघडकीस आले तर अशा प्रकरणात संबंधित संस्थांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण व सँडलवूडमधील अनेक नट-नटय़ांची नावे या प्रकरणात चर्चेत आल्यामुळे ड्रगमाफियांचे नाव सर्वतोमुखी झाले आहे. राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनीही ड्रगमाफियांचे कंबरडे मोडू, असा इशारा दिला आहे. संदीप पाटील यांच्यासारख्या दक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱयाकडे तपासाची जबाबदारी आहे. सरकारनेही या प्रकरणाच्या तपासात कणखरपणा बाळगला आहे. त्यामुळे ड्रगमाफियांची पाळेमुळे बाहेर पडणार, ही अपेक्षा आहे. सध्या माफिया कसा कार्यरत आहे, यापेक्षा सँडलवूडमधील काही कलाकार कसे नशेच्या आहारी गेले आहेत, यावरच अधिक चर्चा झडताना दिसते. या चर्चेने कोरोना महामारीच्या बातम्यांनाही मागे टाकले आहे.