ड्रग्ज डिलर गौरव आर्याची ‘ईडी’कडे कबुली : गोवा ड्रग्ज कनेक्शन उघड : गोवा, दुबईतील मालमत्तेत कर्नाटक आमदाराची भागीदारी
प्रतिनिधी/ मुंबई
बॉलिवुड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सोमवारी ईडीने ड्रग्ज डिलर गौरव आर्याची तर सीबीआयने सुशांतची बहीण मीतू सिंह आणि सिद्धार्थ पिठाणीची कसून चौकशी केली. रियाला वेगवेगळय़ा प्रकारचे ड्रग्ज पुरविण्यात गौरव आर्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. रिया सातत्याने ड्रग्जसाठी फोन तसेच मेसेज करीत असल्याची कबुली गौरव आर्याने दिली.
गौरव आर्या सोमवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात दाखल झाला. ईडीने त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला असता त्याने रिया ड्रग्जसाठी फोन, तसेच मेसेज करीत असल्याची कबुली दिली. तसेच गोव्यातील द टमरिण्ड या हॉटेलमध्ये अनेक पाटर्य़ा आयोजित केल्या जात असून, यामध्ये ड्रग्ज कोठून येते? याचीही माहिती गौरवने दिली. द टमरिण्ड हॉटेल आणि दुबईमध्ये आर्याच्या भागीदारीत अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्तेत कर्नाटकच्या भाजप आमदाराचीही भागीदारी असून, ही भागीदारी कशा प्रकारची आहे, कुठे कुठे मालमत्ता आहेत ? या प्रश्नांना गौरवने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
‘त्या’ आमदाराला ईडी समन्स पाठविणार?
दरम्यान, गौरवचे कर्नाटकातील ज्या भाजप आमदाराशी संबंध आहेत, त्यालासुद्धा मनी लाँड्रिंगअंतर्गत समन्स बजाविण्यात येणार असल्याचे ईडीतील अधिकृत सूत्रांनी सांगितले. अंडरवर्ल्डमधील ड्रग्ज डिलर कासीम आझमी याच्याशी गौरवचे संबंध असल्याचे उघड झाले आहे.
मीतू सिंह-सिद्धार्थ पिठाणीची चौकशी सुरूच
सीबीआयने सोमवारी सुशांतची बहीण मीतू आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यांचीही चौकशी केली. या चौकशीदरम्यान, मीतूने 8 जून ते 14 जूनपर्यंतचा सर्व घटनाक्रम सांगितला. तसेच रियानेच सुशांतची हत्या केल्याचा आरोप मीतूने केल्याचे समजते. सिद्धार्थ पिठाणी हा माफीचा साक्षीदार झाला आहे. त्याने सीबीआयला सर्व सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे.