ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला एनसीबीने रविवारी अटक केली. मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे यांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजच्या घरी एनसीबीच्या सर्च ऑपरेशनमध्ये दहा ग्रॅम गांजा, तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर बनखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईच्या पथकाने काल मुंबईतील पाच ठिकाणी छापा टाकला. लवकरच एनसीबी चौकशीसाठी फिरोजला समन्स पाठवेल, अशी शक्यता आहे.
हा रेड ड्रग्ज पॅडलर्स आणि सप्लायरची धरपकड करण्यासाठी टाकली आहे. यात सुमारे 4 ते 5 ड्रग पॅडलर्स सप्लायर्सला ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्यात गांजा चरससह आणखी एक औषध जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर रोकडसह वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, फिरोज नाडियाडवाला बॉलिवूडमधील मोठे नाव असून त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये आवरा पागल दिवाना, फिर हेराफेरी, वेलकम, कारतूस यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.