बेळगाव /प्रतिनिधी
स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वत्र रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. हे रस्ते बनविताना व्हाईट टॉपिंगचा वापर करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या मधोमध असलेले ड्रेनेज चेंबर हे खोलगट असल्याने नजरचुकीने छोटे-मोठे अपघात घडत आहेत.
हिंदवाडी येथून आरपीडी क्रॉसकडे जाताना जीएसएस कॉलेजसमोरील रस्त्यावर अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एखादे मोठे वाहन समोर असले की मागून येणाऱया वाहनधारकांना ड्रेनेज चेंबर दिसत नसल्यामुळे जोरात ब्रेक मारावा लागत आहे. त्यामुळे मागून येणाऱया वाहनधारकांची धडक बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन येथे नागरिकांनी या डेनेजच्या झाकणावर पेव्हर्सचा थर लावलेला आहे.
ड्रेनेजच्या झाकणावर पेव्हर्स ठेवण्यात आल्यामुळे अपघात कमी होत असले तरी या पेव्हर्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अडथळा होऊ नये तसेच चेंबरमध्ये वाहन अडकून अपघात होऊ नये यासाठी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष घालून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी वाहनधाकांतून होत आहे.