बुडापेस्ट : रविवारी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लीग जलतरण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अमेरिकेचा पुरूष जलतरणपटू तसेच विश्व आणि ऑलिंपिक चॅम्पियन कॅलेब ड्रेसेल आणि ऍडॅम पिटी यांनी कमी पल्ल्याच्या (शॉर्ट कोर्स) जलतरण प्रकारात स्वत:च यापूर्वी नोंदविलेले विश्वविक्रम मागे टाकले.
अमेरिकेचा जलतरणपटू ड्रेसेलने पुरूषांच्या 100 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये नवा विश्वविक्रम करताना 49.28 सेकंदाचा अवधी घेतला. ड्रेसेलने यापूर्वी या क्रीडा प्रकारात 49.88 सेकंदाचा विश्वविक्रम नोंदविला होता. या क्रीडा प्रकारात 2018 साली रशियाचा जलतरणपटू मोरोझोव्हने 50.26 सेकंदाचा अवधी घेत विक्रम केला होता. पुरूषांच्या 100 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ब्रिटनचा 25 वर्षीय जलतरणपटू ऍडॅम पिटीने 55.41 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम नोंदविला. आठवडय़ापूर्वी बुडापेस्टमध्ये एका स्पर्धेत पीटीने या क्रीडा प्रकारात 55.49 सेकंदाचा विश्वविक्रम नोंदविला होता. 2016 च्या ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेचा ड्रेसेल हा दुहेरी सुवर्णपदक विजेता आहे. तसेच 2017 साली बुडापेस्टमध्ये झालेल्या विश्व जलतरण स्पर्धेत त्याने सात सुवर्णपदके तर 2019 च्या वांजेजु येथे झालेल्या स्पर्धेत सहा सुवर्णपदके मिळविली होती.