ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तेलंगणा सरकार उद्यापासून आपल्या स्काय प्रोजेक्टअंतर्गत ड्रोनद्वारे घरपोच औषधांची डिलिव्हरी सुरू करणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, नीती आयोग आणि हेल्थनेट ग्लोबल यांच्या भागीदारीतून हा प्रकल्प सुरू केला जात आहे. या प्रोजेक्टअंतर्गत साइट ड्रोन फ्लाईट्सच्या बियॉन्ड व्हिज्युअल लाईनचा वापर करून विकाराबाद जिह्यातील हवाई क्षेत्रात लसी आणि औषधांचे वितरण केले जाईल.
हा प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी तेलंगणा सरकारने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरी मागितली होती. याला मंत्रालयाने मान्यता दिली असून, शनिवारी विकाराबाद जिह्यातील पोलीस परेड ग्राऊंडवरून या प्रोजेक्टचा शुभारंभ होईल. दरम्यान, स्काय प्रोजेक्टअंतर्गत औषधांची डिलिव्हरी करणारे तेलंगणा हे पहिले राज्य असेल. येथे औषधांची डिलिव्हरी ड्रोनद्वारे केली जाईल. लांब पल्ल्याच्या आणि जड पेलोडवर ड्रोनच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकारी चाचण्या घेत आहेत.